विकासकामांचे नियोजन दीर्घकाळाचा विचार करून व्हायला हवे – मुख्यमंत्री

प्रतिनिधी.

कल्याण – नवीन पत्रीपुलाच्या कामासाठी रेल्वेसह संबंधित सर्वच यंत्रणांनी गतिशीलता दाखवत या पुलाचे काम मार्गी लावले. त्याचप्रमाणे सर्वच विकासकामांचे नियोजन पुढचे पन्नास ते शंभर वर्ष डोळ्यासमोर ठेवून व्हायला हवे. आपल्याला शाश्वत विकास करायचा असून त्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

भिवंडी – कल्याण शिळफाटा रस्त्यावरील पत्रीपूल उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा ऑनलाइन पध्दतीने झाला. यावेळी प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी व्यासपीठावर नगरविकासमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री श्री.एकनाथ शिंदे,पर्यावरण व पर्यटनमंत्री श्री.आदित्य ठाकरे, कल्याण डोंबिवली महानगरपालिका महापौर विनिता राणे, खासदार कपिल पाटील, डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार रविंद्र चव्हाण, विश्वनाथ भोईर, प्रमोद पाटील, गणपत गायकवाड, बाळाजी किणीकर, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर,आयुक्त डॉ. विजय सूर्यवशी यांसह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

नवीन पत्रीपुलाच्या कामाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, एमएसआरडीसी उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे कौतुक करत अत्यंत उपयोगी काम विक्रमी वेळेमध्ये पूर्ण केल्याबद्दल शाबासकीची थाप दिली. तसेच  या कामाप्रमाणे शिळफाटा रस्त्याचे कामही आपल्याला विक्रमी वेळेमध्ये पूर्ण करून दाखवा असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी एमएसआरडीसी अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान कल्याणसह डोंबिवलीकरांसाठी पत्री पूल हा अत्यंत महत्त्वाचा होता. त्याचे काम  पूर्ण होऊन पत्रीपुलाचे लोकार्पण झाल्याने वाहतुककोंडी कमी होणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

प्रत्येक नागरिकाने जबाबदार नागरिक म्हणून वागले पाहिजे. आपण कोरोना नियंत्रणात आणला असला तरी अद्याप धोका टळलेला नाही. लसीकरण सुरु झाले असले तरी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे शासनाचे प्रमुख कर्तव्य आहे.  मास्क वापरणे, हात धुणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे आवश्यक आहे. तुम्ही खबरदारी घ्या, जबाबदारी आम्ही घेतलेली आहे असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी केले.

हा पूल अतिशय महत्त्वाचा असून भिवंडी शिळ, नाशिक, अहमदाबाद तसेच जेएनपीटीकडे जाणाऱ्या अवजड वाहनांच्या दृष्टीने, महत्त्वाचा पूल आहे. अनेक तांत्रिक अडचणींवर मात करुन आपण विहित मुदतीत काम पूर्ण केले. हैद्राबाद येथे संपूर्ण गर्डर बनविण्याचे काम करण्यात आले.  106 मीटर लांबीचा पूल आहे.रेल्वे विभागाने या कामासाठी पुरेसे सहकार्य केले.हा पूल लोकांसाठी खुला होणार आहे. याचा आनंद आहे. ठाण्याचा कोपरी पूलदेखील येत्या मार्च महिन्यात नागरिकांसाठी खुला होणार आहे.कल्याण डोंबिवलीतील विकासकामे वेगाने सुरु आहेत.येथील रस्त्याची कामे झाल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या कमी होईल.

यावेळी  खासदार कपिल पाटील व डॉ. श्रीकांत शिंदे यांचेही भाषण झाले. प्रास्ताविक करताना राधेश्याम मोपलवार म्हणाले, 104 वर्ष जुना पत्रीपूल पाडून नवीन पूल उभारण्याचे नोव्हेंबर 2018 निश्चित केले. 109 मीटर लांबीचा पूल आहे. हे सर्व काम 1 वर्ष 20 दिवसात पूर्णत्वाकडे नेण्यात आले.पत्रीपुलाचे लोकार्पण झाल्याने आजपासून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web