राष्ट्रीय मतदार दिनी ई-मतदार ओळखपत्र वाटपाचा प्रारंभ

मुंबई, दि.23: राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने येत्या सोमवार दि. 25 जानेवारी रोजी राज्यभरात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे दि.25जानेवारी रोजी राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी दिली. या दिवसापासून भारत निवडणूक आयोग ई-मतदार ओळखपत्राचे (ई-ईपिक) वाटप सुरु करणार असून मतदारांना त्यांचे मतदार ओळखपत्र मोबाईल अथवा संगणकावर डाउनलोड करता येणार आहे.

भारत निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी, 1950 रोजी करण्यात आली होती. याचे औचित्य साधून भारत निवडणूक आयोग सन 2011 पासून दरवर्षी 25 जानेवारीला ‘राष्ट्रीय मतदार दिन’ साजरा करतो. राष्ट्रीय मतदार दिनाचा देश पातळीवरील मुख्य कार्यक्रम भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली येथे आयोजित करतात. राज्यस्तरावर मुख्य निवडणूक अधिकारी राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करतात.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान आणि मुख्य अतिथी म्हणून राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर हे असणार आहेत. सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव (सेवा) श्रीमती सुजाता सौनिक, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल, राज्याचे कोविड टास्क फोर्स प्रमुख डॉ. संजय ओक, कोकण विभागाचे विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, अभिनेत्री व सदिच्छादूत निशिगंधा वाड यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे.

दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधून शाळा- महाविद्यालयांमध्ये वाद-विवाद स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. यावर्षी कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सर्व दक्षता घेऊन मर्यादित स्वरूपात हा दिवस साजरा करण्यात येत आहे.

या कार्यक्रमामध्ये नवीन मतदारांना मतदान ओळखपत्रांचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात येणार आहे. तसेच भारत निवडणूक आयोगाकडून हाती घेतलेल्या उपक्रमांच्या चित्रफिती दाखविण्यात येणार आहेत. यावर्षीच्या राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून भारत निवडणूक आयोग ई-मतदार ओळखपत्राचे (ई-ईपिक) वाटप सुरु करणार आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web