अहिल्यादेवी यांच्या पुतळा उभारण्याच्या जागेची,आ. रोहित पवार यांच्याकडून पाहणी

प्रतिनिधी.

सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवी यांचा भव्य पुतळा उभारणार असून गुरुवारी कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी विद्यापीठास भेट देऊन कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्याकडून यासंदर्भात आढावा घेतला. यावेळी त्यांनी पुतळा उभारण्याच्या जागेची पाहणी करून यासाठी आवश्यक ती मदत करणार असल्याचे सांगितले.

यावेळी कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी आमदार पवार यांना अहिल्यादेवी यांचा पुतळा व अध्यासन केंद्राबाबत सर्व माहिती दिली. यावेळी आमदार पवार म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, खासदार सुप्रिया सुळे आणि माझी स्वतःची पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवी यांचा भव्य अश्वारूढ पुतळा व अध्यासन केंद्र उभारण्याची ईच्छा व मानस आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून पुतळा उभारण्यासाठी पूर्णपणे मदत करणार असल्याची ग्वाही आमदार पवार यांनी यावेळी दिली. लवकरच कामाला सुरुवात होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या की, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवी यांचा भव्य पुतळा उभारला जाणार आहे. अध्यासन केंद्राची निर्मिती होणार आहे. अहिल्यादेवी यांच्यासारख्या एका मोठ्या व्यक्तीच्या पर्वालाच ही सुरुवात होत आहे आणि संपूर्ण समाजासाठी हि एक भूषणावह बाब राहील. यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून जागा निश्चित झाली आहे. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असेही कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी आमदार संजयमामा शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, कुलसचिव डॉ. विकास घुटे, क्रीडा संचालक सुरेश पवार, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, संतोष पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुहास कदम, प्रशांत बाबर, सोमेश क्षीरसागर, अक्षय शिंदे आदी उपस्थित होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web