खोटं बोला पण रेटून बोला अशी भाजपची भूमिका -विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

प्रतिनिधी

कल्याण – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला आपली जागा समजून येईल असा गर्भित इशारा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला दिला आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव संजय दत्त यांच्या घरी पटोले यांनी सदिच्छा भेट दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपला हा इशारा दिला.
भाजप कसा आहे हे आता जनतेला कळू लागले आहे. खोटं बोला पण रेटून बोला अशी भाजपची भूमिका असल्याची टीकाही पटोले यांनी यावेळी केली. भाजपने आता जनतेच्या मनातील कौल ओळखला पाहीजे. जनतेच्या मनात काय सुरू आहे आताच्या निवडणुक निकलावरूनही त्यांना समजत नसेल तर त्याला काही अर्थ नाही. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला आपली जागा कळून येईल असे पटोले यांनी सांगितले.
तर प्रदेशाध्यक्षपदाबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता पक्ष जो आदेश देईल त्याचे पालन करणे आपली जबाबदारी असून त्याला आपण चांगल्या प्रकारे न्याय देऊ असेही त्यांनी सांगितले. तसेंच आगामी कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत एकत्र लढायचे किंवा वेगवेगळे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नसल्याने त्यावर भाष्य करणे योग्य नसल्याचेही नाना पटोले यांनी सांगितले.
या सदिच्छा भेटीवेळी कल्याण जिल्हा काँग्रेसतर्फे नाना पटोले यांचे जंगी स्वागत करण्यात आले. युवक काँग्रेस उपाध्यक्ष ब्रिज दत्त, काँग्रेसचे कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, प्रदेश प्रतिनिधी मुन्ना तिवारी, महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी, उपाध्यक्ष विमल ठक्कर, यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी कल्याण जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष विमल ठक्कर यांच्या नामांकित ‘साईनाथ’ शॉपलाही भेट दिली.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web