राज्य शासन आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज यांच्यात सामंजस्य करार

प्रतिनिधी.

मुंबई – राज्यातील लघु-सूक्ष्म व मध्यम (एसएमई) उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी उद्योग विभाग व बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयातील दालनात उद्योग विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी तसेच बीएसईतर्फे अजय ठाकूर यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे राज्यातील लघु-सूक्ष्म तसेच मध्यम स्वरुपाच्या उद्योगांना भांडवल उभारणीसाठी पुरेसे पर्याय उपलब्ध होतील, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.

बीएसईचे प्रमुख अजय ठाकूर म्हणाले की, ‘या कराराद्वारे आम्ही राज्यातील विविध एसएमई, त्यांचे प्रतिनिधी आणि उद्योग संघटनांपर्यंत पोहोचून त्यांच्यात जनजागृती करणार आहोत. मागील दोन वर्षांत ३३१ लघु उद्योगांनी शेअर बाजारातून सुमारे २२ हजार कोटी इतके एकत्रित भांडवल गोळा केले. त्यामुळे अल्प खर्चात त्यांच्या उद्योगवाढीच्या योजना कार्यान्वित करता आल्या. छोट्यांना मोठे होण्याची संधी मुंबई शेअर बाजारामुळे सहज उपलब्ध झाली आहे’, असेही श्री.ठाकूर यांनी सांगितले.

महाराष्ट्रात सध्या दहा लाख नोंदणीकृत लघु-मध्यम स्वरुपाच्या उद्योगांची अधिकृत नोंद आहे. या कंपन्यांनी भांडवली बाजारात नोंदणी केल्यास त्यांच्या उद्योगाची व्याप्ती वाढेल, शिवाय रोजगार वाढीस चालना मिळेल. भांडवली बाजाराचे फायदे पटवून देण्यासाठी बीएसईतर्फे जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून लघु-मध्यम उद्योगांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. अधिक जनजागृतीसाठी राज्यातील विविध औद्योगिक संघटनांकडून संयुक्त शिबिरेदेखील घेतली जाणार आहेत. मुंबई शेअर बाजारामध्ये ३३१ लघु-मध्यम कंपन्यांनी यशस्वीपणे भांडवल उभारणी केली, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी चेंबर्स ऑफ कॉमर्ससोबत राज्य शासनाच्या सामंजस्य कराराचे नूतनीकरण करण्यात आले. नवी मुंबई येथे कौशल्य विकास केंद्र उभारणे तसेच अन्न प्रक्रिया पार्कची उभारणी करण्यावर यावेळी चर्चा करण्यात आली. उद्योग विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी तसेच आयएमसीचे अध्यक्ष राजीव पोतदार यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web