मुस्लिम समाजाच्या किसानबाग आंदोलनामुळे जातीवादी राजकारणाला शह मिळेल – एड. प्रकाश आंबेडकर

प्रतिनिधी.

औरंगाबाद – दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शाहीन बागच्या धर्तीवर वंचित बहुजन आघाडीच्या पुढाकारातुन दिनांक २७ जानेवारी रोजी सर्व जिल्ह्यात “किसान बाग” आंदोलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. अत्याचारग्रस्तांनी एकत्र येऊच नये असे आरएसएसचे षडयंत्र आहे म्हणुन मुस्लिम व इतर घटकांमध्ये संघर्ष निर्माण करण्याचे काम ते करतात. हे अत्याचार पिडित घटकांना विभागून त्यांच्यावर अत्याचार करू इच्छित आहे म्हणून किसान बागच्या  माध्यमातुन या आंदोलनात मुस्लिम समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. मुस्लिम समाजाच्या ‘किसानबाग’ आंदोलनामुळे आरएसएस-भाजपच्या जातीवादी राजकारणाला शह मिळेल असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत केले.

या बाबतीत वंचित बहुजन आघाडीच्या मुस्लिम पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली आंबेडकर भवन, मुंबई येथे संपन्न झालेल्या बैठकीत राज्यव्यापी किसान बाग आंदोलन घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

वादग्रस्त नवीन कृषी कायद्यांविरूद्ध दिल्लीच्या सिमेंवर शेतकरी आंदोलन अनेक दिवसांपासून सुरू आहे. या आंदोलनाला विविध क्षेत्रांतून प्रचंड पाठिंबा मिळत आहे. शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नुकतेच 17 डिसेंबर रोजी राज्यभर वंचित बहुजन आघाडीच्यावतीने मोठे आंदोलन करण्यात आले होते. त्याच धर्तीवर हे आंदोलन सुरू ठेवून मुस्लिम समाज संघटनांना सोबत घेऊन आंदोलनकारी शेतकर्‍यांना समर्थन दर्शविण्यासाठी शाहीन बागच्या शैलीत एकदिवसीय ‘किसान बाग’ आंदोलन करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली.
पुढे बोलताना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले की, धर्मांध जातीयवादी शक्तींनी देशातील शेकडो मुसलमानांचा छळ करत माॅबलिंचींग सारखे अत्याचार केले, हजारो दलितांचा शोषन सुरु आहे परंतु वर्तमान व्यवस्थेने देशातील लाखो शेतकऱ्यांचा इतका छळ केला की त्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले गेले. याला आम्ही शासन पुरुस्कृत हत्या समजतो. या वरुन देशात शेतकरी हा सर्वात अत्याचार पिडीत आहे व सर्व पिडित-शोषीत घटकांनी एकत्रीत येऊन शेतक-यांच्या आंदोलनाला बळ देण्याची गरज आहे, ते पुढे म्हणाले की सिएए एनआरसी विरोधी आंदोलनाच्या वेळी केंद्र सरकारने सत्ता व अधिकारांचे दुरुपयोग करत दिल्लीतील शाहीन बाग चळवळीला चिरडण्याच प्रयत्न करत होते त्यावेळी पंजाबच्या निरनिराळ्या भागातील शेतकऱ्यांनी शाहीन बागेत येऊन लंगर व आंदोलकांच्या समर्थनाचे औदार्य दाखवले होते आणि आत्ता पंजाबमधील शेतकर्‍यांशी एकरुपता व सहानुभूती दाखवत मुस्लिमसमाजाने आपापल्या शहरांमध्ये किसान बाग आंदोलन सुरू करण्याचे घेतलेले निर्णय हे अभिनंदनीय आहे.  या देशाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आरएसएससारख्या संघटनेला सत्तेपासून दूर ठेवणे ही काळाची गरज असून  त्यासाठी सर्व उत्पीडित लोकांमध्ये ऐक्य असणे आवश्यक आहे असेही प्रकाश आंबेडकरांनी सांगितले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता तथा किसान बाग आंदोलनाचे राज्य समन्वयक फारुख अहमद, प्रदेश प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे, प्रदेश प्रवक्ता अमित भुईगळ, जिल्हाध्यक्ष प्रभाकर बकले, जिल्हाध्यक्ष योगेश बन, शहराध्यक्ष संदीप शिरसाठ, प्राचार्य डॉ. सुनील वाकेकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. अब्दुल समद अब्दुल नसिरुद्दीन, जिल्हा उपाध्यक्ष खालिद पटेल, शहर उपाध्यक्ष हाजी अहमद कादरी, महासचिव इरफान इलाही खान, महासचिव अफसर पठाण, मुख्य संघटक आसिफ अब्रार,  सय्यद मुख्तार, बाबा पटेल, सुभान शहा, शेख रईस, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web