कुक्कुटपालक नागरिकांनी बर्ड फ्ल्यूबाबत काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

प्रतिनिधी.

रायगड – सध्या बर्ड फ्लूबाबतची भीती सर्वत्र पसरलेली दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सुभाष म्हस्के आणि जिल्हा पशु विकास अधिकारी डॉ.बंकट आर्ले यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, पक्ष्यांमधील बर्ड फ्लू या आजाराविषयीची योग्य ती माहिती समजून घेऊन त्याप्रमाणे काळजी घ्यावी,भीती बाळगू नये, व अफवांवर विश्वास ठेवू नये.

पक्ष्यांमध्ये अचानक मोठया प्रमाणात मर्तृक आढळल्यास तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थांना त्वरीत कळवावे. पोल्ट्री फार्म मधील पक्ष्यांचा इतर जंगली पक्षाशी (उदा.बदके, कबूतर, पोपट, चिमण्या, कावळे इ.) संपर्क होणार नाही, याची दक्षता घेणे व जैव सुरक्षा नियमांची अंमलबजावणी करणे. कुक्कुटपालकांनी शेड व परिसरामध्ये स्वच्छता बाळगणे. नियमित सोडीयम हायपोक्लोराईड, धुण्याचा सोडा, चुना लावून परिसर निर्जंतुकीकरण करणे. संशयित/प्रादूर्भाव झालेल्या फार्मवरुन पक्ष्यांची वाहतूक, खरेदी विक्री थांबवावी.*नागरिकांनी घ्यावयाची काळजी :- चिकन व अंडी 100 अंश डि.से.वर शिजवूनच खावीत, चिकन स्वच्छ करताना हॅण्ड ग्लोजचा वापर करावा, समाजमाध्यमातून व इतर प्रसारमाध्यमातून प्रसारित होणाऱ्या अफवांपासून सावध राहावे, मांस,अंडी व मासे चांगली शिजवून बिनधास्त खा व निरोगी राहा तसेच अधिक माहितीसाठी www.ahd.maharahstra.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी किंवा नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.

भीती नको काळजी हवी, हे करा :- पक्ष्यांच्या स्त्रावासोबत तसेच विष्ठेसोबत संपर्क टाळा, पक्षी, कोंबड्याचे पिंजरे आणि ज्या भांड्यात त्यांना रोज खाणे दिले जाते,अशी भांडी रोज डिटर्जंट पावडरने स्वच्छ धुवा, शिल्लक उरलेल्या मांसाची योग्य विल्हेवाट लावा, एखादा पक्षी मरण पावला तर अशा पक्षाला उघड्या हाताने स्पर्श करु नका, जिल्हा तसेच विभागीय नियंत्रण कक्षाला ताबडतोब कळवा, कच्च्या पोल्ट्री उत्पादनासोबत काम करताना पाणी व साबणाने आपले हात वारंवार धुवा, व्यक्तिगत स्वच्छता राखा, परिसर स्वच्छ ठेवा, कच्चे चिकन किंवा चिकन उत्पादनासोबत काम करताना मास्क आणि ग्लोजचा वापर करा, पूर्ण शिजवलेले मांसच खा, आपल्या परिसरात जलाशय किंवा तलाव असतील आणि या तलावात पक्षी येत असतील तर अशी ठिकाणे वन विभाग अथवा पशुसंवर्धन विभागास कळविणे आवश्यक आहे.*हे करु नका:-* कच्चे चिकन किंवा कच्ची अंडी खाऊ नका, अर्धवट शिजलेले मांस/चिकन किंवा अर्धवट उकडलेली अंडी खाऊ नका, आजारी दिसणाऱ्या सुस्त पडलेल्या पक्षाच्या संपर्कात येऊ नका, पूर्णपणे शिजलेले मांस आणि कच्चे मांस एकत्र ठेवू नका, असेही आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web