भंडारा नवजात अर्भकांच्या मृत्यू प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा वंचितची मागणी

प्रतिनिधी.

मुंबई– भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणात दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून प्रत्येक कुटुंबाला दहा लाखाचे अर्थसहाय्य मंजूर करण्याची मागणी वंचित बहूजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता तथा युवा प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी केली आहे.

ह्या दुर्दैवी घटनेत ज्यांचे नवजात मुलं गेली त्या कुटुबियांच्या दु:खात वंचित सहभागी असून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नैतिक जबाबदारी घेत राजीनामा द्यावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे.या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या बालकांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये देण्यात येणार असल्याचेही जाहीर केले आहे.ही मदत तोकडी असून कमीत कमी दहा लाख रुपये प्रत्येक कुटुंबातील पालकांना देण्यात यावेत, अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
याप्रकरणाची सखोल चौकशी करताना दोषींवर कठोर करवाई केली जाईल आणि आगीच्या कारणांचा बोध घेऊन भविष्यात अशा घटना घडणार नाही याची दक्षता घेण्याची लोकप्रिय घोषणा सरकार करीत आहे.परंतु शासकीय रुग्णालयाकडे सरकारचे लक्षच नाही. भंडारा जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू वॉर्डमध्ये मध्यरात्री दीडच्या सुमारास आग लागली. शॉट सर्कीटमुळे आग लागल्याचे प्रथमदर्शी अंदाज व्यक्त केला आहे.मात्र ह्याची सर्व बाजूने सखोल चौकशी करून ह्यामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे, असेही राजेंद्र पातोडे ह्यांनी सांगितले आहे.

या दुर्घटनेमुळे १० बालकांचा मृत्यू झाला असून त्यातील तिघांचा आगीत होरपळून तर अन्य सात बालकांचा धुराने गुदमरून मृत्यू झाला आहे.ही घटना सरकारी आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणा व अनास्थेमुळे घडलेली दिसते.आगीच्या कारणांचा बोध घेऊन भविष्यात अशा घटना घडणार नाही यासाठी दक्षता व उपाययोजना अंमलात आणण्यासाठी टास्क फोर्स नेमण्याची मागणी देखील वंचित बहूजन आघाडीने केली आहे

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web