कोरोना लसीकरणासाठी ठाणे जिल्हा सज्ज

प्रतिनिधी.

ठाणे – केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार ठाणे जिल्ह्यातील ६ महानगरपालिका व ग्रामीण क्षेत्रांमध्ये कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहिम आज राबविण्यात आली. या मोहिमेचा शुभारंभ नगरविकासमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालय येथे करण्यात आला. लसीकरण मोहिमेसाठी ठाणे जिल्ह्याची सर्व तयारी पुर्ण झाली आहे. शासनाचे आदेश मिळताच तात्काळ लसीकरणास प्रारंभ करण्यात येईल असे पालकमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले. जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आयोजित या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते,आरोग्य उपसंचालक डॉ.गौरी राठोड, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे, माता बाल संगोपन अधिकारी डॉ.अंजली चौधरी आदी उपस्थित होते. प्रत्यक्ष लसीकरण सुरु करण्यापूर्वी, लसीकरणाबाबतची आव्हाने व त्यानुसार मार्गदर्शक सुचना तयार करणे, लसीकरण मोहिमेतील सर्व स्तरावरील अधिकारी तसेच कर्मचारी यांचा आत्मविश्वास वाढविणे यासाठी सरावचाचणी घेण्यात आली.

ठाणे जिल्हयात लसीकरणाची सराव चाचणी १२ केद्रांवर घेण्यात आली.यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय, ठाणे,उपजिल्हा रुग्णालय, शहापुर, प्राथमिक आरोग्य केंद्र दिवा अंजुर, तसेच ठाणे मनपा व भिवंडी निजामपुर मनपा हद्दीत २ केंद्रांवर तर उर्वरित कल्याण डोंबिवली, नवीमुंबई, उल्हासनगर, मीरा भाईंदर येथे प्रत्येकी १ केद्रांवर चाचणी घेण्यात आली. दिवा अंजुर प्राथमिक केंद्रावर घेण्यात आलेल्या चाचणी वेळी जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती कुंदन पाटील उपस्थित होते. कोविड-19 मोहिमेत लाभार्थीं नोंदणी, लसीकरण सत्राचे नियोजन, प्रत्यक्ष लसीकरण सत्रासाठी लागणाऱ्या लसीच्या वितरणाच्या नोंदी, लाभार्थ्याला लस दिल्याची नोंद, लसीकरणपश्चात गुंतागुतीची नोंद व लाभार्थीला लस मिळाल्याचे प्रमाणपत्र या सर्व गोष्टी भारत सरकारने UNDP च्या सहकार्याने बनविलेल्या कोविन cowin हया अँपव्दारे होणार आहे. सदर मोहिमेत आज वर उल्लेख केलेल्या सर्व बाबींची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली. प्रत्यक्ष लसीकरण प्रक्रियेमधील सर्व बाबी प्रत्यक्षात राबविण्यात आल्या. प्रक्रिया राबविताना काही अडचणी येतात का हे तपासण्यात आले. यामुळे लस उपलब्ध झाल्यावर जेव्हा लसीकरण मोहिम प्रत्यक्षपणे राबविली जाईल तेव्हा सदर अडचणी येणार नाहीत व सगळे सुरळीतपणे करणे सुलभ होईल. प्रत्येक संस्थेत सरावा दरम्यान 25 आरोग्य कर्मचारी लाभार्थी म्हणुन निवडण्यात आले होते. हयात लाभार्थीला प्रत्यक्ष कोणतीही लस / इंजेक्शन न देता बाकी सर्व प्रक्रियेची पडताळणी करण्यात आली. लसीकरण टिम चा भाग म्हणुन लसीकरण अधिकारीवर व्हँक्सीनेटर प्रत्येक सत्रात असणार आहे. 3 स्वंतत्र खोल्या असणार आहेत. प्रथम खोली प्रतिक्षा कक्ष दुसऱ्या खोलीत प्रत्यक्ष लसीकरण तर तिसरी खोली निरिक्षणगृह असणार आहेत. तीन नंबरच्या या खोलीत लसीकरण पश्चात प्रत्येक लाभार्थीला अर्धा तास निगराणीखाली ठेऊन त्याला काही त्रास होतो का हे तपासण्यात येणार आहे व त्रास झाल्यास त्वरीत उपचार देण्यासाठी साठी व्यवस्था असणार आहे. प्रथम लसीकरण अधिकारी लाभार्थींची यादीतील नावानुसार खात्री झाल्यावर लाभार्थीला रुम नं 2 मध्ये सोडणार आहे. तेथे ब्दितीय लसीकरण अधिकारी लाभार्थीचे ओळख पत्र तपासून अँप मधील माहितीनुसार तोच लाभार्थी असले बाबत आँपमध्ये नोंद करेल. त्यानंतर लाभार्थीला लस देणार व व्दितीय लसीकरण अधिकारी लस दिल्याबाबत अँपमध्ये नोंद करणार, लसीकरण पश्चात अर्धा तासात लाभार्थ्यास काहि त्रास झाल्यास त्याची नोंद Software मधे केली जाऊन नंतर सर्व लाभार्थीना लस दिल्यावरअँप मधे लसीकरण सत्र समाप्त झालेबाबत नोंद केली जाणार आहे. सद्य स्थितीत ठाणे जिल्हयांतर्गत (महानगरपालिका क्षेत्र बगळता) एकुण 8855 लाभार्थीची cowin software वर नोंद झाली असुन महानगर पालिका क्षेत्र धरुन 59 हजार 572 लाभार्थीची नोंद झाली आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web