पर्यावरणाच्या जतन आणि संवर्धनासाठी,माझी वसुंधरा ई-शपथ

प्रतिनिधी.

ठाणे – राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने ‘माझी वसुंधरा’ या अभियानांतर्गत  देण्यात येणारी हरित ई शपथ (ई – प्लेज) आज पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील  सर्व अधिकारी व कर्मचारी यांना दूरदृश्यप्रणालीव्दारे दिली. तसेच जिल्हावासियांना  नवीन वर्षाच्या  आरोग्यदायी शुभेच्छा दिल्या.

माझी वसुंधरा या अभियानातून पर्यावरण रक्षण साध्य करण्यासाठीच्या सूचना उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी सर्व जिल्ह्यात नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यासह जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये  ई शपथ   कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पालकमंत्री श्री. शिंदे  यांनी अभियानाविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले व  पाणी वाचविण्याचा संदेश देणारी शपथ दिली.

यावेळी पालकमंत्री श्री शिंदे  म्हणाले, निसर्गाच्या आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी लोक एकत्र आले पाहिजेत. हे अभियान ही लोकचळवळ  उभी करण्यासाठीच्या एक मार्ग आहे. परंतु ही चळवळ शासनाच्या किंवा सरकारपुरती मर्यादित राहता कामा नये. यामध्ये प्रत्येक व्यक्तीने आपले कर्तव्य म्हणून प्रत्यक्ष सहभाग नोंदविणे आवश्यक आहे.

माझी वसुंधरा या अभिनव उपक्रमाचे संकेतस्थळ majhivasundhara.in हे आजपासून सुरु झाले असून नवीन वर्षात पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी राज्यातील नागरिकांनी पर्यावरण संवर्धनाची किमान एक तरी शपथ घ्यावी.  ही शपथ घेण्यासाठी नागरिकांनी http://www.majhivasundhara.in या संकेतस्थळाला भेट देऊन #EPledge ला क्लिक करून शपथ घ्यावी.  या संकेतस्थळावर शपथेचे विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या पर्यायाव्यतिरिक्त नागरिकांना व्यक्तिगत पातळीवर अन्य कोणतीही शपथ घेता येऊ शकणार आहे. ही शपथ घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीस प्रमाणपत्र तात्काळ उपलब्ध होणार आहे.

नागरिकांनी मोठ्या संख्येने पर्यावरण रक्षणासाठी शपथ घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

या कार्यक्रमात जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर ,अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे, ठाणे महानगरपालिका  आयुक्त  बिपीन शर्मा, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका आयुक्त पंकज आशिया , मिरा – भाईंदर महानगरपालिका आयुक्त  विजय राठोड, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यंवशी,उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त  डॉ.राजा दयानीधी,नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री.अभिजित बांगर आदी सहभागी झाले.

Share via
  •  
  •  
  •  
  •  
  •  

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web