कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची माणुसकीची भिंत

प्रतिनिधी.

कल्याण -महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या निर्देशानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिका व हेल्पींग हॅण्ड या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विदयमाने “माणुसकीची भिंत” ही अभिनव संकल्पना घनकचरा विभागाचे उपआयुक्त रामदास कोकरे आणि उप अभियंता मिलींद गायकवाड यांच्या प्रयत्नातून आता साकारण्यात येत असून आज महापालिकेच्या कल्याण येथील ब प्रभागातील राणी लक्ष्मीबाई उदयानात उभारलेल्या माणुसकीच्या भिंतीचा शुभारंभ उपआयुक्त रामदास कोकरे आणि उप अभियंता मिलींद गायकवाड, ब प्रभागक्षेत्र अधिकारी सुहास गुप्ते, आरोग्य निरिक्षक संजय धात्रक व हेल्पींग हॅण्ड या सामाजिक संस्थेचे सचिन राऊत व त्यांचे सहकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

या “माणुसकीच्या भिंतीसाठी” महापालिकेने जागा पुरविली असून देखरेखीची व्यवस्था हेल्पींग हॅण्ड या सामाजिक संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. सदर‍ भिंतीमध्ये रकान्यांची रचना करण्यात आली असून त्यामध्ये नागरिक त्यांना नको असलेले सुस्थितीतील कपडे, त्यांना निरुपयोगी असलेल्या पण गरजेच्या वस्तू ठेऊ शकतील. महापालिका परिसरातील कोणीही गरजू व्यक्ती या वस्तूंचा वापर करु शकणार आहे.महापालिकेच्या इतर प्रभागक्षेत्रातही गरिब व गरजू व्यक्तींसाठी माणूसकीची भिंत उभारण्याचा महापालिकेचा मानस आहे. तरी महापालिका क्षेत्रातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी त्यांचेकडील त्यांना नको असलेले सुस्थितीतील कपडे, त्यांना निरुपयोगी असलेल्या पण गरजेच्या वस्तू माणुसकीच्या भिंतीमध्ये ठेऊन आपल्या समाज बांधवांसाठी मदतीचा हात पुढे करावा.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web