रेल्वे रुळावर पडलेल्या इसमाचे प्राण वाचविणाऱ्या लता बनसोडे यांचा महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला सत्कार

प्रतिनिधी.

मुंबई – पश्चिम रेल्वेच्या ग्रांट रोड रेल्वे स्थानकावरील रेल्वे रुळावर चक्कर येऊन पडलेल्या इसमाचे नागरिकांच्या मदतीने प्राण वाचविणाऱ्या महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या महिला जवान श्रीमती लता बनसोडे यांचा मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी भायखळा येथील महापौर निवासस्थानी आज दि. ३० डिसेंबर २०२० रोजी सत्कार करून तिच्या धाडसाचे कौतुक केले.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या महिला जवान श्रीमती लता बनसोडे व तिचे वरिष्ठ अधिकारी श्रीमती प्रांजली जाधव, डीएस कोरे यांचा शाल, साडी व भेटवस्तू देऊन सत्कार केला.
महापौर किशोरी पेडणेकर मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, एक महिला म्हणून श्रीमती लताताईने दाखविलेल्या धाडसाचा अभिमान असून तुझ्या कार्यतत्परतेमुळे त्या इसमाचे आज प्राण वाचू शकले. लताताईने दाखविलेले साहस व कार्यतत्परता कौतुकास्पद असून यापुढेही अश्या प्रसंगाला तू धैर्याने सामोरे जावे, अशी सदिच्छा महापौरांनी यावेळी व्यक्त केली.

श्रीमती लता बनसोडे यावेळी मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, त्या इसमाचे प्राण वाचविणे ही अशक्यप्राय वाटणारी गोष्ट होती. परंतु जीव धोक्यात घालून आपल्याला त्या इसमाचे प्राण वाचविणे आवश्यक आहे, हे डोळ्यासमोर होते. रेल्वे रुळावर त्या इसमाला मला एकट्याने उचलणे शक्य नसल्यामुळे सर्वप्रथम मी धावत जाऊन येणारी ट्रेन थांबविली व त्यानंतर प्रवाशांच्या मदतीने त्या इसमाला उचलून रेल्वे स्थानकावर प्रथमोपचार दिल्याचे सांगितले. त्यानंतर थोड्यावेळाने टॅक्सीमध्ये बसवून त्या इसमाला त्याच्या घराकडे रवाना केल्याचे त्यांनी सांगितले.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web