बृहन्मुंबई महानगरपालिकेची नागरी दैनंदिनी २०२१ व दिनदर्शिका २०२१ प्रकाशित

प्रतिनिधी.

मुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क खात्यातर्फे निर्मित सन २०२१ च्या मराठी नागरी दैनंदिनी २०२१ (सिव्हिक डायरी) तसेच दिनदर्शिका २०२१ (सिव्हिक कॅलेंडर) चे प्रकाशन मुंबईच्‍या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते महानगरपालिका मुख्‍यालयातील महापौर दालनात दि. २९ डिसेंबर २०२० रोजी करण्यात आले. बृहन्मुंबई महानगरपालिकेची नागरी दैनंदिनी २०२१ ही माहितीने परिपूर्ण तसेच उपयुक्त आहे. सन २०२१ ची दिनदर्शिकादेखील अतिशय आकर्षक असून त्याची संकल्पना लक्षवेधी आहे, असे उद्गार मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी किशोर पेडणेकर यांनी काढले. या प्रकाशन प्रसंगी स्‍थायी समितीचे अध्‍यक्ष श्री. यशवंत जाधव, महानगरपालिका आयुक्‍त श्री. इक्बाल सिंह चहल, अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्री. संजीव जयस्वाल, सहआयुक्त (सामान्य प्रशासन) श्री. मिलिन सावंत, उप आयुक्त (मनपा आयुक्त कार्यालय) श्री. चंद्रशेखर चोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. महानगरपालिका मुद्रणालयाचे व्यवस्थापक श्री. सुधीर तळेकर,अधिक्षक अर्चना गांगुर्डे आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

नागरी दैनंदिनी व दिनदर्शिकाकरिता मार्गदर्शन करणारे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्री. संजीव जयस्वाल, दिनदर्शिकेची संकल्पना मांडणारे सह आयुक्त (सामान्य प्रशासन) श्री. मिलिन सावंत, प्रकाशक तथा जनसंपर्क अधिकारी (प्र.) श्री. तानाजी कांबळे, उप जनसंपर्क अधिकारी श्री. गणेश पुराणिक, उप जनसंपर्क अधिकारी श्री. मिलिंद बाफना, छायाचित्रकार श्री. संजय जवळेकर व श्री. धि‍रज निपुर्ते, उपयोजित चित्रकार श्री. विष्णू शेलार यांच्यासह सुंदर छपाईबद्दल मुद्रणालयाचे सर्व सहकारी अभिनंदनास पात्र आहेत, असे महापौरांनी नमूद केले. मुंबईकर नागरिकांना महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने देण्यात येणाऱया सोयीसुविधांची तपशिलवार माहिती आणि महानगरपालिकेतील पदाधिकारी व अधिकारी, विभाग यांचे संपर्काचे अद्ययावत तपशील नागरी दैनंदिनीच्या माध्यमातून मुंबईकरांपर्यंत पोहचत असतात. या नागरी दैनंदिनीला नागरिकांकडून दरवर्षी मोठी मागणी असते, हे या दैनंदिनीचे ठळक वैशिष्ट्य असल्याचे महानगरपालिका आयुक्‍त श्री. इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले.
महानगरपालिकेचे जनसंपर्क खाते सन १९५८ पासून नागरी दैनंदिनी (सिव्हिक डायरी) प्रकाशित करीत असून यंदा नागरी दैनंदिनीचे ६३ वे वर्ष आहे. नागरी दैनंदिनी ६३ वर्षांपासून सातत्याने प्रकाशित करीत असताना ती एक संग्राह्य नि महत्वपूर्ण माहितीसह परिपूर्ण असेल, यावर भर दिला जातो.

यावर्षीच्या नागरी दैनंदिनीमध्ये मुंबईचे महापौर, उप महापौर तसेच महानगरपालिका सदस्य यांचे प्रभागनिहाय, पक्षनिहाय नावे समावेश करण्यात आली आहेत. तसेच निवासस्थानांचे पत्ते, दूरध्वनी क्रमांक देण्यात आले आहेत. महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ, मुंबईतील सन्माननीय खासदार, सन्माननीय विधिमंडळ सदस्य यांच्यासह महानगरपालिका आयुक्त, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, सहआयुक्त, उपायुक्त आणि इतर पालिका अधिकारी यांचे संपर्क क्रमांक आहेत. महानगरपालिका पुरवित असलेल्या विविध नागरी सेवा- सुविधांची माहितीदेखील त्यात समाविष्ट आहे. तसेच महत्त्वाचे नागरी संपर्क क्रमांक, सार्वजनिक सुट्टय़ा, नागरी प्रशासनाची माहिती अशी विविध उपयुक्त माहिती व महानगरपालिकेशी निगडित छायाचित्रेही या दैनंदिनीत आहेत. नागरी दैनंदिनी व दिनदर्शिकेचे मुद्रण भायखळा येथील महानगरपालिका मुद्रणालयात करण्यात आले आहे.

Share via
  •  
  •  
  •  
  •  
  •  

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web