उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बँकांच्या ‘सीएसआर’ निधीतील कामांचे लोकार्पण

प्रतिनिधी.

पुणे – विविध खासगी बँकांनी सामाजिक बांधिलकी राखत त्यांच्या ‘सीएसआर’ (सामाजिक उत्तरदायित्व निधी) फंडातून ‘कोविड-१९’च्या लढाईसाठी केलेल्या कामांचे उद्घाटन तसेच विविध उपकरणांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. विधान भवनाच्या (कौन्सिल हॉल) सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास आमदार चेतन तुपे, अण्णासाहेब बनसोडे, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पिंपरी चिंचवडचे मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, ससूनचे अधिष्ठाता डॉ.मुरलीधर तांबे, बंधन बॅंकेचे प्रादेशिक प्रमुख सत्यजित मोहिते, एचडीएफसी बॅंकेच्या राज्य प्रमुख स्वाती शाळीग्राम, लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.

‘कोविड-१९’ विरुद्धच्या लढाईत सामाजिक बांधिलकी राखत समाजातील सर्वस्तरातील व्यक्ती आणि संस्थांनी मदतीचा हात देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत एचडीएफसी, बंधन बॅंक, ॲक्सिस बॅंक या बँकांनी आपल्या ‘सीएसआर’ निधीचा मोठा वाटा ‘कोविड-१९’च्या लढ्यासाठी उपलब्ध करुन दिला. या निधीच्या माध्यमातून ‘कोविड-१९’ लढ्यासाठी आवश्यक असणारी विविध उपकरणे आणि आवश्यक सामुग्री उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

पमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘ॲक्सिस बँके’च्या माध्यमातून ‘कोविड आणि स्वच्छ भारत’ अभियानासाठी उभारण्यात आलेल्या टेक्नोपर्पल नियंत्रण प्रणालीचे ई-उद्घाटन करण्यात आले. तसेच ‘बंधन बँके’च्या माध्यमातून दळवी रुग्णालयात लावण्यात आलेल्या ९८ पॉईन्ट असलेल्या जम्बो ऑक्सिजन यंत्रणा तसेच ससून रुग्णालयात लावण्यात आलेल्या ड्युरा सिलेंडरच्या वाफेच्या यंत्रणेचे ई-उद्घाटन आणि ‘एचडीएफसी’ बँकेच्या माध्यमातून लायगुडे रुग्णालयाला पुरविण्यात आलेल्या दोन ऑक्सिजन जनरेटरचेही ई-उद्घाटन करण्यात आले. त्याचबरोबर ‘बंधन बँके’च्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सामुग्रीसह ‘कोविड’ जनजागृतीची यंत्रणा असलेल्या दूरदर्शन संचाचेही लोकार्पण करण्यात आले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘एचडीएफसी’ बँकेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या एचएएल मशीन, संगणक संच, पोर्टेबल एक्स-रे मशीन, इसीजी मशिन, पुणे शहरासाठीचे दोन मोबाईल क्लिनीक, कार्डीयाक रुग्णवाहिका, शव वाहिका, निगेटिव्ह आयोन जनरेटरचे लोकार्पण करण्यात आले.. यावेळी ‘कोविड’च्या काळात करण्यात आलेल्या विविध कामांसंबंधिची लघू चित्रफित दाखविण्यात आली. यापूर्वीही एचडीएफसी, बंधन बँक, ॲक्सिस बँकांसह इतर संस्थांनी ‘कोविड-१९’च्या लढ्यासाठी मोठी मदत केली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ बुटाला यांनी केले.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web