गिरणी कामगार सांस्कृतिक चळवळीतील संगीतकार महादेव खैरमोडे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार

प्रतिनिधी.

मुंबई – गिरणी कामगार सांस्कृतिक चळवळीत आपला खारीचा वाटा उचलून, तिला समृद्ध करण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या कलावंता मधील गिरणी कामगार संगीतकार महादेव खैरमोडे यांचा अमृतमहोत्सवी वाढसानिमित्त हृद्यसत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र सांस्कृतिक अभियान न्यासच्या वतीने बुधवारी काळाचौकी येथील अहिल्या शिक्षण केंद्राच्या हॉलमध्ये हा अभिष्ठचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता.समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी मुंबई महानगर पालीका विरोधी पक्षनेते, संस्थेचेअध्यक्ष किसन जाधव होते.जीवनधारा फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश खाडे, कथालेखक काशिनाथ माटल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.प्रारंभी संस्थेचे कार्यकारी विश्वस्त संतोष परब यांनी प्रास्ताविक केले.कला क्षेत्रात आपल्या नृत्य आणि कुशल कला व्यवस्थापनाने सुपरिचीत असलेल्या नमन नटवराच्या निर्मात्या सायली परब यांचाही विशेष गुणगौरव करण्यात आला.
मुंबईच्या प्रभादेवी बॉम्बेडाई़ग मिल मध्ये काम करणारे गिरणी कामगार महादेव खैरमोडे यांनी ७०च्या दशकात शाहीर आत्माराम पाटील यांच्या पासून प्रेरणा घेऊन सांस्कृतिक चळवळीत पाय रोवले.शाहीर अमरशेख,शाहीर साबळे,शाहीर दादा कोंडके आदी कलावंतांनी गिरणी कामगार सांस्कृतिक चळवळीचा फुलविलेला काळ खैरमोडे यांनी जवळून पाहिला.गिरणी कामगार आंतरगिरणी भजन स्पर्धेत प्रथम आलेल्या महादेव खैरमोडे यांनी हौशि तसेच व्यवसायिक रंगभूमी वरील लोकनाट्य आपल्या बहारदार संगीतानी गाजवली.शाहीर मधू खामकर,दत्ता ठुले,शांताराम चव्हाण आदींच्या कार्यक्रमाना हार्मोनियम साथ करीत,सांस्कृतिक वारसा पुढे नेला,हा इतिहास त्या वेळी आपल्या भाषणात किसन जाधव,राजेश खाडे यांनी जागवून खैरमोडे यांचा कला प्रवास उलगडून दाखवला.
कथालेखक काशिनाथ माटल म्हणाले,आजकाल यश आणि कीर्तीच्या मागे जग धावातांना दिसते.पण महादेव खैरमोडे यांना संगीतातील कर्तबगारीवर हे यश मिळत गेले आहे. सन २०१७ मध्ये राष्ट्रीय मिल मजदूर संघाद्वारे त्यांना कामगार चळवळीतील मानाच्या गं.द.आंबेकर श्रम गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले,ही त्यांच्या यशाची पावती आहे.खरेतर महादेव खैरमोडे गिरणी कामगार सांस्कृतिक चळवळीचा ठेवा आहे,असेही काशिनाथ माटल म्हणाले.प्रसिद्ध शाहीर मधू खामकर यांनी कार्यक्रमाला धावती भेट देऊन खैरमोडे यांचे अभिष्ठचिंतन केले.
खैरेमोडे यांनी अलिकडेच शाहिरी लोक कला मंचाच्या स्थापनेत मोलाचा वाटा ऊचलून ही परंपरा पुढे नेली या गोष्टीचा गौरव करण्यात आला.सभागृहात सौ.खैरमोडे यांचाही औक्षण करून सन्मान करण्यात आला

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web