काँग्रेसच्या वरिष्ठांकडून डावलल्यानेच राष्ट्रवादीत प्रवेश, राष्ट्रवादीत गेलेल्या काँग्रेसच्या १८ नगरसेवकांची स्पष्टोक्ती

प्रतिनिधी.

भिवंडी – काँग्रेसची साथ सोडत महापौर निवडणुकीपासून काँग्रेसपासून दूर झालेल्या भिवंडी मनपाच्या १८ नगरसेवकांनी अखेर बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार , मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाने शहरात काँग्रेसची ताकद कमी झाली असून राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. मात्र भिवंडी शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या राजकारणाला वैताकून आपण राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला असल्याची कबुली या १८ नगरसेवकांनी गुरुवारी मनपाचे उपमहापौर इम्रान खान यांच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक जावेद दळवी यांनी त्यांच्या महापौर पदाच्या कारकिर्दीत केवळ भाजप व कोणार्कच्या नगरसेवकांना मदत केली मात्र आम्ही काँग्रेसमध्ये सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक असतानाही आमच्या वार्डात साधे गटर , नाले व रस्त्यांची कामे देखील झाली नाहीत. आम्ही जेव्हा जेव्हा आमच्या वार्डातील निधीसाठी मागणी करत होतो त्यात्या वेळी आमच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने आमच्या प्रभागांमध्ये विकासकामे झाली नसल्याने आमच्या विरोधात स्थानिक नागरिकांचा रोष वाढत होता. त्यामुळेच आपण काल मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला असल्याची कबुली देखील या नगरसेवकांनी या पत्रकार परिषदेत दिली.                    

विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष भगवान टावरे या पत्रकार परिषद व नगरसेवकांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या स्वागत समारंभापासून अलिप्त राहिले. त्यांच्या या अलिप्त राहिल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता याचे उत्तर भगवान टावरे स्वतः पक्ष श्रेष्ठींना देतील मात्र राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जावेद फारुकी हे आमच्या मित्र परिवारातील असून त्यांच्या शब्दाखातरच आपण आज राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला असल्याची कबुली देखील या १८ नगरसेवकांनी दिली आहे. आमच्या पक्ष प्रवेशाने जर काँग्रेस नेत्यांनी आमच्यावर कारवाई केली तरी चालेल आम्ही राष्ट्रवादीच्या चिन्हावर पुन्हा निवडून येऊन शहर विकासासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही देखील या पत्रकार परिषदेत नगरसेवकांनी दिली आहे.                    

दरम्यान एकही नगरसेवक नसतांना तब्बल १८ नगरसेवक राष्ट्रवादीत दाखल झाल्याने त्यांच्या स्वागत समारंभात व पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अलिप्त राहिल्याने भविष्यात काँग्रेस प्रमाणेच राष्ट्रवादीत देखील शहराध्यक्षपदाच्या खांदे पालटाची शक्यता वर्तविण्यात येत असून येत्या दहा दिवसांत जावेद फारुकी शहराध्यक्ष होतील अशा घोषणा देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या पत्रकार परिषदेत दिल्याने राष्ट्रवादीत देखील भविष्यात दोन गट पडतात कि काय अशी शंका निर्माण झाली आहे. 

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web