सोलापूरातील बारा परीक्षा केंद्रावर २७ डिसेंबर रोजी होणार सेट परीक्षा

प्रतिनिधी.

सोलापूर – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठद्वारे आयोजित सहायक प्राध्यापक पदासाठीची 36 वी पात्रता परीक्षा (एम.एस. सेट – 2020) रविवार, दि. 27 डिसेंबर, 2020 रोजी ऑफलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी महाराष्ट्र व गोवा राज्यातील 1,11,106 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून या दोन्ही राज्यातील 16 शहरामधील 239 परीक्षा केंद्रावर या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.

एम.एस. सेट – 2020 या परीक्षेसाठी सोलापूर शहर व परिसरातील 6079 विद्यार्थी परीक्षा देणार असून यासाठी सोलापूर शहरातील 12 परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आलेली आहेत. यामध्ये संगमेश्वर कॉलेज, वालचंद कला व शास्त्र महाविद्यालय, हिराचंद नेमचंद कॉमर्स कॉलेज, कस्तुरबाई शिक्षणशास्त्र महाविद्यालय, वालचंद इन्स्टिीटयूट ऑफ टेक्नालॉजी, डी. बी.एफ. दयानंद कॉलेज, श्री सिध्देश्वर वुमेन्स पॉलीटेक्नीक, एस. ई. एस. पॉलीटेक्नीक, सोलापूर सोशल असोसिअशनचे आर्टस ॲन्ड कॉमर्स कॉलेज, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय, एन.बी. नवले सिंहगड इंजिनिअरींग कॉलेज व संगणकशास्त्र संकुल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ या परीक्षा केंद्रांचा समावेश आहे.

दि. 27 डिसेंबर 2020 रोजी होणारी सेट परीक्षा दोन सत्रात घेतली जाणार असून पहिले सत्र (पेपर -1) सकाळी 10.00 ते 11.00 व दुसरे सत्र (पेपर – 2) सकाळी 11.30 ते दु. 1.30 या वेळेत असेल. परीक्षा सुरु होण्यापूर्वी दोन तास अगोदर म्हणजे सकाळी 08.00 वाजल्यापासून विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्र खुले केले जातील. कोव्हीड-19 साठीच्या प्रतिबंधात्मक उपायांची तंतोतंत अंमलबजावणी करुनच विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाईल. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा प्रवेशपत्र तसेच ओळखपत्र (मुळप्रत व छायांकित प्रत) सोबत आणावी तसेच विद्यार्थ्यांनी मास्क, ग्लोज, सॅनिटायझर बॉटल, पिण्याच्या पाण्याची बॉटल, पेन इ. वस्तु स्वत: सोबत आणने आवश्यक आहे. परीक्षे संदर्भातील सर्व सूचना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या असून विद्यार्थ्यांनी त्याचे पालन करावे तसेच परीक्षे संदर्भात अधिक माहितीसाठी संबंधित परीक्षा केंद्राचे संचालक किंवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील संगणकशास्त्र संकुलाचे संचालक तथा प्र. कुलसचिव डॉ. विकास घुटे (मो. नं. 9881372729) यांच्याशी संपर्क साधवा, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web