मुंबई पोर्ट ट्रस्ट कामगार विशेषांक २०२० चे प्रकाशन

प्रतिनिधी.

मुंबई – कोव्हीड काळात सध्या सगळेच उद्योग आर्थिक संकटात आहेत. आयात निर्यातीसाठी कंटेनरची कमतरता असल्यामुळे यापुढे आपल्या देशात कंटेनरची निर्मिती केली जाईल. कोणत्याही शहराचा आकार वाढल्यावर वाहतुकीमुळे बंदराच्या आयात निर्यातीवर मर्यादा येतात. या आव्हानात्मक काळात पोर्ट व कामगार हिताचे निर्णय घेतांना कामगार संघटनांचे सहकार्य घेऊ, असे स्पष्ट उदगार मुंबई पोर्ट ट्रस्टचे चेअरमन राजीव जलोटा यांनी पोर्ट ट्रस्ट कामगार विशेषांक प्रकाशांप्रसंगी काढले.
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने २२ डिसेंबर २०२० रोजी बॅलार्ड पिअर येथील पोर्ट भवनमध्ये २४ व्या ” पोर्ट ट्रस्ट कामगार विशेषांक ” २०२० चे प्रकाशन मुंबई पोर्ट ट्रस्टचे चेअरमन राजीव जलोटा यांच्या शुभहस्ते झाले.याप्रसंगी राजीव जलोटा आपल्या भाषणात म्हणाले की, कामगारांनी पोर्ट ट्रस्ट कामगार अंक काढून, कुटुंबापर्यंत पोहचविण्याचा एक आदर्श निर्माण केला आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये सहा हजार कामगार असून छत्तीस हजार पेन्शनर आहेत.कोव्हीड काळात ज्या कामगारांनी पोर्ट ट्रस्टचे चांगले काम करून पोर्ट ट्रस्टची उत्पादकता वाढविली त्यांचा गुणगौरव करण्याची सूचना चांगली आहे, त्याचा आपण निश्चित विचार करू. ज्येष्ठ कामगार नेते ऍड. एस. के. शेट्ये यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, डॉ. शांती पटेल यांच्या प्रेरणेने या अंकाची निर्मिती झाली असून, कदाचित कामगार विशेषांक काढणारी भारतातील आमची एकमेव कामगार संघटना असावी. मुंबई पोर्ट ट्रस्टला पुन्हा चांगले दिवस येतील. पोर्ट ट्रस्टच्या विधायक कार्याला आमच्या संघटनेचे नेहमीच सहकार्य मिळेल.
युनियनचे जनरल सेक्रेटरी, मुंबई पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त व अंकाचे उपसंपादक सुधाकर अपराज यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाला दरवर्षी अनेक पुरस्कार मिळाले असून, मुंबई मराठी पत्रकार संघाचा मानाचा समजला जाणारा ” केशवराव कोठावळे पुरस्कार” देखील या अंकाला मिळाला आहे. कोव्हीड काळात पोर्ट ट्रस्ट कामगारांनी जीव धोक्यात घालून शेवटपर्यंत पोर्ट ट्रस्टचे काम चालू ठेऊन पोर्ट ट्रस्टची उत्पादकता वाढविली. ज्या कामगारांनी कोव्हीडच्या संकट काळात पोर्ट ट्रस्टचे काम केले, अशा सर्व कामगारांचा पोर्ट तृस्टने गुणगौरव केला पाहिजे. अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात सांगितले की, आतापर्यंत अनेक मान्यवरांच्या हस्ते या अंकाचे प्रकाशन झाले असून, डॉ. शांती पटेल यांनी कामगारांना लिहिण्यासाठी कामगार व्यासपीठ निर्माण केले आहे. त्यामुळे अनेक कामगारांचे व मान्यवरांचे लेख, कथा, कविता आम्ही या अंकात प्रसिद्ध करतो. शेवटी आभार युनियनचे सेक्रेटरी व अंकाचे सहसंपादक दत्ता खेसे यांनी मानले.पोर्ट ट्रस्ट कामगार विशेषांक प्रकाशन प्रसंगी युनियनचे पदाधिकारी सर्वश्री विजय रणदिवे, विकास नलावडे, निसार युनूस, संदीप कदम, मनीष पाटील, बाळकृष्ण लोहोटे, पुंडलीक तारी, संदीप चेरफळे आदी मान्यवर उपस्थित होते.
आपला

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web