सोलापुरात केंद्रीय पथकापुढे शेतकऱ्यानी मांडल्या व्यथा

प्रतिनिधी.

सोलापूर– ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराने सिना व भिमा नदिकाठच्या शेतकर्यांच्या शेती,लाईट,जनावरे व पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तब्बल दोन महिन्याने आलेल्या केंद्रीय पथकाने सोलापूर जिल्ह्यातील लांबोटी,कोळेगाव,पेनूर ता.मोहोळ येथील शेतकर्यांच्या शेतीला भेट देवून पहाणी केली यावेळी लांबोटी,कोळेगाव,आष्टे,भांबेवाडी येथील शेतकर्यांनी आपल्या व्यथा पथकासमोर मांडून नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळाली नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला.
केंद्रीय पथकाने मोहोळ तालुक्यातील लांबोटी, कोळेगाव,पेनूर येथील शेतकर्‍यांच्या शेतातील शेतीपिके व अन्य नुकसानीची पाहणी केली.
ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने व त्यामुळे आलेल्या महापुराने जिल्ह्यातील अक्कलकोट,दक्षिण सोलापूर,मोहोळ, मंगळवेढा,सांगोला, पंढरपूरबरोबरच अन्य तालुक्यातील शेतीपिकांची मोठी हानी झाली होती. काढणीला आलेली पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकर्‍यांचे अर्थचक्र कोलमडून पडले आहे. अतिवृष्टीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाला भेटी देऊन पाहणी केली होती.
त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी शेतकर्‍यांना अर्थसहाय करण्याचे आश्वासन देऊन पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार प्रशासनाने पंचनामे करून जिल्ह्यात 935 कोटींचे नुकसान झाल्याचा अहवाल राज्य सरकारला दिला होता. दरम्यान, शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठविला होता. परंतु केंद्र सरकारने काही मदत केली नाही. आता तब्बल दोन महिन्यांनी नुकसानीच्या पाहणीसाठी पथक पाठवून अश्रूग्रस्त शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार चालविला आहे. केंद्र सरकारच्या या दिरंगाईबद्दल शेतकर्‍यांतून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, नुकसानीच्या खाणाखुणा पुसून गेल्यानंतर आता दोन महिन्यांनी केंद्रीय पथक काय पाहणी करत आहे,असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी उपस्थित केला आहे.
या पथकासमवेत जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने होते,या पथकात नवी दिल्ली येथील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सचिव रमेश घंटा, केंद्रीय ग्रामविकास विभागाचे उपसचिव यशपाल,केंद्रीय वित्त मंत्रालयाचे सल्लागार आर. बी. कौल,जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर,नागपूर कृषी विभागाचे संचालक ओ. पी. सिंग, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचे मुख्य अभियंता तुषार व्यास, नागपूर जलशक्ती विभागाचे अधीक्षक अभियंता महेंद्र सहारे, या पथकासमवेत प्रांतधिकारी सचिन ढोले,तहसीलदार जीवन बनसोडे,गटविकास अधिकारी गणेश मोरे आदिसह विविध विभागांचे अधिकारी होते.केंद्रीय पथकाच्या दौर्यावेळी पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांनी चोक बंदोबस्त ठेवला होता.

लांबोटी ता.मोहोळ येथे 40 गाड्यांच्या लवाजम्यासह पथक दाखल झाल्यानंतर लांबोटी येथील शेतकरी तात्या चंदनशिवे यांच्या शेतातील नुकसान झालेल्या पिकांची पहाणी पथकाने सिना नदिवरील पुलारून केली.पहाणी करून पथक पुढील दौर्यासाठी कोळेगाव येथे जाण्यासाठी निघत असताना पुलावरच पथकाला घेवून आलेली चार चाकी गाडी बंद पडली.पथकातील अधिकार्यांनी लागलीच दुसर्या गाडीत बसून पुढील दौर्यासाठी प्रस्थान केले.

सिना नदिकाठी माझी शेती असून लाख-सव्वा लाखाचे नुकसान झाले आहे.राज्यशासनाकडून अद्यापही नुकसान भरपाईची मदत मिळालेली नाही.तब्बल दोन महिन्याने केंद्रीय पथक नुकसान झालेल्या भागाची पहाणी करण्यासाठी आले आहे.पथक येवून गेल्यानंतर ही मदत देण्यासाठी शासन आणखी किती वेळ लावेल हे सांगता येत नाही. कोळेगाव येथील बंधार्यावर केंद्रीय पथक पहाणी साठी आले असता शेतकर्यांनी गराडा घालून विविध समस्यां पथकासमोर मांडल्या.पिकांचे नुकसान होवून तब्बल दोन महिने उलटूनही शासन,प्रशासन मदत देत नसल्याने शेतकर्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web