कोविडच्या पार्श्वभूमीवर नाताळ साधेपणाने साजरा करण्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आवाहन

प्रतिनिधी.

मुंबई – कोविड-19 मुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या वर्षी नाताळ सण साध्या पद्धतीने व गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार साजरा करण्याचे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.

ख्रिश्चन बांधवांनी या वर्षीचा नाताळचा सण साध्या पद्धतीने साजरा करावा. नाताळ सणानिमित्त चर्चमध्ये कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करावे. चर्चमध्ये त्यावेळी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व शारीरिक अंतर (फिजिकल डिस्टन्सिंग) राखले जाईल याची प्रामुख्याने काळजी घ्यावी. चर्चमध्ये निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी. मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

नाताळ सणाच्या दरम्यान चर्चमध्ये प्रभू येशूंच्या जीवनावरील देखावे, ख्रिसमस ट्री अशा काही वस्तू ठेवल्या जातात. त्या पाहण्यासाठी भाविक गर्दी करतात. त्या ठिकाणीदेखील शारीरिक अंतर (फिजिकल डिस्टन्सिंग) व स्वच्छतेचे नियम पाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात. चर्चमध्ये प्रभू येशू ख्रिस्त यांचे स्तुतीगीत (Choir) गाण्यासाठी कमीत कमी गायकांचा (Choirsters) समावेश करण्यात यावा. त्यावेळी वेगवेगळ्या माईकचा वापर करुन फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे.

घरातील 60 वर्षावरील नातेवाईक तसेच 10 वर्षाखालील बालके यांच्या सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. शक्यतो त्यांनी घराबाहेर जाणे टाळावे व नाताळ घरामध्येच साजरा करावा. आयोजकांनी त्यांच्यासाठी ऑनलाईन प्रार्थनेची (Online Masses) सुविधा उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करावी. ज्याचा लाभ घरी असणाऱ्या व्यक्तींनाही होईल. त्याचप्रमाण कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षित होणार नाही अशा धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमाचे अथवा मिरवणुकांचे आयोजन करण्यात येऊ नये. फटाक्याची आतषबाजी करु नये. ध्वनी प्रदूषणासंदर्भातील नियमांचे व तरतुदींचे काटेकोर पालन करावे.

२५ डिसेंबर रोजी चर्चमध्ये आयोजित करण्यात येणारी प्रार्थना (Thanks Giving Mass) ही मध्यरात्री आयोजित न करता संध्याकाळी 7.00 वाजता किंवा त्यापूर्वी घेण्याचे नियोजन करता येईल का हे पाहावे, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web