सांगलीतील कूडनूर गावात कुऱ्हाडबंदी, वृक्षावर कुऱ्हाड न चालवण्याचा ग्रामस्थांनी केला निश्चय

प्रतिनिधी.

सांगली – वैभवाच्या, अभिमानाच्या आणि स्वाभिमानाच्या अनेक खाणाखुणा मोठ्या अभिमानाने आपल्या अंगावरती मिरवणाऱ्या कुडनूर गावाने कुऱ्हाडबंदीचा निर्णय घेतला आहे. त्याचा प्रत्यक्ष फायदा गावाला झाल्याचे आज दिसून येत आहे. ग्रामस्थांनी एकत्रित येत गावात कोणत्याही वृक्षावर कुऱ्हाड चालवायची नाही. असा निश्चय केला आहे. तसेच वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी चंग बांधला आहे. त्यामुळेच गावात आज विविध प्रकारची झाडे मोठ्या दिमाखाने डोलत उभी आहेत…

गावात पार कट्ट्यावर असलेले लिंबाचे झाड कांही वर्षांपूर्वी जिर्ण होऊन पडले. ती गोष्ट ग्रामस्थांच्या फार जिव्हारी लागली. या झाडाशी गावचे एक वेगळ्या प्रकारचे नाते होते. झाडाला असलेल्या लांबचलांब मुळ्या जमिनीवर होत्या. त्यामुळे लहान मुलं त्या मुळ्यामध्ये आगिनगाडी किंवा रेल्वेगाडी करून खेळ खेळायचे… त्या मुळ्यामध्ये लपांडवही चालायचा, उन्हात लोक सावलीला थांबायचे, पावसाळ्यात पावसापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी अनेकजण त्याच झाडाखाली आश्रय घ्यायचे. थंडी – वाऱ्यातही लोक झाडाच्या निवार्‍याला थांबायचे… इतकच काय तर पंचमंडळी या झाडाच्या खाली असलेल्या आणि मुळ्यापासून तयार झालेल्या खुर्चीसारख्या आकाराच्या त्या खुर्चीवर बसून न्यायदानाचे पवित्र कार्यही करायचे. मात्र ते लिंबाचे झाड जिर्ण होऊन पडले… त्यामुळे त्या झाडासोबत असलेल्या अनेक आठवणीमुळे गावकरी शोकाकुल झाले होते. त्यानंतर लगेचच ग्रामस्थांनी त्याच जागी लिंबाचे दुसरे झाड लावण्याचा निर्णय घेतला आणि स्व. नामदेव पांढरे, जयकर कोळी व इतर ग्रामस्थांनी पुढाकार घेत त्याच जागी लिंबाचे दुसरे नविन झाड लावले. गावकऱ्यांनी या झाडाला पोटच्या पोराप्रमाणे जपले. आज हे झाड मोठे झाले असून पुन्हा एकदा या झाडाखाली सर्व ग्रामस्थ येऊन बस – उठ करत आहेत. तर ग्रामपंचायतनेही या झाडाला आता कट्टा बांधला आहे. त्यामुळे हे झाड भक्कम झाले असून, झाडाला पाणी घालण्यापासून ते झाड वाढवण्याच्या दृष्टीने योग्य ती सर्व प्रकारची काळजी ग्रामस्थ घेत आहेत. परिणामी गावचे गेलेले सौंदर्य आणि गतवैभव पुन्हा एकदा परत मिळाले आहे.

दुसऱ्या बाजूला गावात गावच्या प्रवेशद्वारावरतीच दोन चिंचेची भली मोठी झाडे होती. या चिंचेच्या झाडाला लोक पंचमीच्यावेळी झोपाळा बांधत, कालिदास सुतार, कृष्णदेव सुतार, दीपक कोळी त्यासाठी पुढाकार घेत… एरव्ही या झाडाखाली लोक सावलीला थांबत, ऊन – वारा पाऊस यापासून स्व. संरक्षण करण्यासाठी या चिंचेच्या झाडाचा सहारा घेत. या झाडांचे वैशिष्ट्ये म्हणजे ही दोन्ही झाडे एकाच उंचीची आणि एकसारखी वाढली होती. त्यामुळे ती दिसायला हुबेहूब होती. म्हणून तर ग्रामस्थ त्यांना जोड चिंच म्हणत… या जोड चिंचेच्या मधून बैलगाडी जाण्यासाठी रस्ता होता. किंबहुना याच रस्त्याने डफळापुरला जाता येत होते. पावसाळ्यात, उन्हाळ्यात, हिवाळ्यात गावात अनेक प्रकारचे निसर्गातील पाहुणे येत. वेगवेगळ्या रंगाचे, आकाराचे, प्रजातीचे पक्षी, माकड या झाडावर पाहायला मिळायचे…मात्र दुर्दैवाने सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ही दोन्ही झाडी एकाच वेळेस पडली. आणि गावकरी पुन्हा एकदा हळहळले… त्यामुळे या झाडांची कसर भरून काढण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येत पुन्हा एकदा या झाडांची आठवण म्हणून तशाच प्रकारची झाडे लावण्याचा निश्‍चय केला आणि त्याच परिसरात वडाचे झाड लावले. सांगलीहून सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ पांढरे यांनी हे झाड आणले. त्यानंतर हे वडाचे झाड संभाजी पांढरे, शामराव हिप्परकर, सुभाष पांढरे, स्व. दादासाहेब सरगर, तत्कालीन उपसरपंच आणि विद्यमान सरपंच अमोल पांढरे, भास्कर कोळी, माजी सरपंच – सतीश पांढरे, अज्ञान पांढरे यांच्या पुढाकाराने लावण्यात आले. पुढे हे झाडं स्व. नामदेव पांढरे, जयकर कोळी, दादासाहेब पांढरे यांनी पाणी घालून वाढवले. आज या झाडाची पूजा अर्चा करण्यात गाव कुठेही कमी पडत नाही. वटपौर्णिमेदिवशी गावातील महिला मंडळी या झाडाची विशेष पूजाअर्चा करतात. या झाडाभोवती फेरे घेतात… आज हे झाड गावच्या सौंदर्यात मोलाची भर टाकत आहे. त्याशिवाय मरीआई मंदिराच्या परिसरातही स्व. नामदेव पांढरे आणि शामराव पांढरे यांनी पिंपळ व इतर वृक्षांची लागवड करून त्याचे जतन केले आहे. आज ही झाडंही मोठी झाली आहेत. आणि या झाडाच्या सावलीखालाही आज ग्रामस्थ बस उठ करत आहेत. आणि ही झाडेही मरीआई मंदिराचा परिसर सुशोभित करून मंदिराच्या सौंदर्यात भर टाकत आहेत. ग्रामपंचायत कार्यालयासमोर अशोक वृक्ष मोठ्या दिमाखाने डोलत आहे. तर प्राथमिक जिल्हा परिषद शाळेच्या अवरातही विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवड केली आहे. विविध प्रकारची ही झाडे शहराच्या सौंदर्यात भर टाकत आहेत. शालेय विद्यार्थ्यांनी या झाडांना आपला सच्चा मित्र मानला असून, या झाडांची ते निगा राखत आहेत. त्यामुळे ही झाडे आज शाळेची एक प्रकारची ओळख बनली आहेत. तसेच रामचंद्र पाटील यांच्या घराच्या पाठीमागे असलेले चिंचेचे झाडही ग्रामस्थांनी मोठ्या प्रेमाने जोपासले आहे. या चिंचेच्या झाडाच्या गर्द सावलीत आज ग्रामस्थ आणि वाटसरू विश्रांती घेतात. हे पाहून मनअगदी भारावून जात. गावातील इतर ग्रामस्थांनीही आपल्या दारात अनेक झाडांचे संगोपन केले आहे. नायकू सुतार यांच्या दारात फुलांची, फळांची झाडे पाहायला मिळतात. तर आनंदा सरगर, विलास व्हनमाने, सुभाष कदम, तानाजी माने, जगन्नाथ मलमे, पिंटू मलमे, राजू सोलंकर, संजय आठवले, शांताराम आठवले आणि इतर सर्वच ग्रामस्थांच्या दारात उभी असलेली नारळ, लिंब, चिंच आदी झाडे ग्रामस्थांचे झाडावरील आपले प्रेम, माया, ममता आपुलकी आणि जिव्हाळा याची प्रचिती देत आहेत.

अनिल पाटील ,बाळासाहेब मासाळ, सतीश पांढरे सरपंच मा. श्री. अमोल पांढरे यांच्या प्रयत्नातून मायक्का मंदिर परिसरातही वृक्ष लागवड करून ती जतन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच गावात आणखी झाडे लावण्याचाही प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे एकूणच कुऱ्हाडबंदीचा घेतलेला निर्णय आज सर्व ग्रामस्थांसाठी अभिमानाचा विषय बनला आहे.

तर या संदर्भात बोलताना, सरपंच अमोल पांढरे म्हणाले की कुडणूर – शिंगणापूर रस्त्याच्या दुतर्फा लावलेली झाडे आता हळूहळू मोठी होत आहेत. त्याप्रमाणेच कुडणूर – डफळापुर आणि कुडणूर – कोकळे या मार्गावरही रस्त्याच्या दुतर्फा झाडांची लागवड करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तसेच वृक्ष लागवडीसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले आहे. त्या सर्वांचे त्यांनी अभिनंदनही केले आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web