औरंगाबादच्या पर्यटन विकासालाही मिळणार चालना

प्रतिनिधी.

मुंबई – औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांच्या विकासासंदर्भातही पर्यटन मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक झाली. या बैठकीस महसूल आणि ग्रामविकास विभागाचे राज्यमंत्री श्री. अब्दुल सत्तार, आमदार श्री. अंबादास दानवे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, ‘एमटीडीसी’चे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, पर्यटन संचालक श्री. धनंजय सावळकर उपस्थित होते. औरंगाबाद जिल्हाधिकारी ऑनलाईन सहभागी झाले होते.

जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळांना जोडणारे रस्त्यांचे जाळे मजबूत असावे. सर्व रस्ते दर्जेदार कसे होतील यादृष्टीने कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना श्री. ठाकरे यांनी यावेळी दिल्या. पर्यटकांसाठी शहरात सुरु करावयाच्या हॉप ऑन, हॉप ऑफ वाहतूक व्यवस्थेचाही यावेळी आढावा घेण्यात आला.

राज्यमंत्री श्री. अब्दुल सत्तार म्हणाले की, औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा आणि वेरुळ ही दोन्ही जागतिक स्तरावरील पर्यटनस्थळे आहेत. औरंगाबाद-फर्दापूर-अजिंठा लेणी यासह जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळांना जोडणाऱ्या रस्त्यांचा दर्जेदार विकास होणे आवश्यक आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद आदी संबंधीत यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. सोयगांव तालुक्यातील फर्दापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याचा मानस असून शिवरायांच्या कार्यातून युवा पिढीला प्रेरणा मिळत रहावी यासाठी हे स्मारक महत्वपूर्ण ठरणार आहे. यासाठी चालना देण्यात यावी. जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा अधिक विकास होणे, त्याचबरोबर त्यांची प्रचार-प्रसिद्धी होऊन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी एमटीडीसी आणि पर्यटन विभागामार्फत चालना देण्यात यावी, असे निर्देशही श्री.सत्तार यांनी यावेळी दिले.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web