कुपोषित बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी जिल्हा परिषद, स्वदेस फाउंडेशन व आय.आय.पी. यांच्यात सामंजस्य करार

प्रतिनिधी.

अलिबाग – एकात्मिक बाल विकास प्रकल्प, रायगड जिल्हा परिषद, स्वदेस फाउंडेशन आणि आयपीसी ( भारतीय बालरोग तज्ञ संघटना ) यांच्यामध्ये रायगड जिल्ह्यातील म्हसळा, श्रीवर्धन, तळा, पोलादपूर, महाड, माणगाव व सुधागड तालुक्यातील तीव्र व मध्यम कुपोषित बालकांच्या आरोग्य संदर्भात उपचार करण्यासंबंधी सामंजस्य करार दि.16 डिसेंबर रोजी करण्यात आला. या करारावर रायगड जिल्हा परिषद तर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, स्वदेस फाउंडेशन तर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे, आरोग्य विभागाचे मुख्य व्यवस्थापक डॉ. सुरेंद्र यादव, महाव्यवस्थापक तुषार इनामदार, व्यवस्थापक डॉ. सचिन अहिरे, सुधीर वाणी तसेच आय.पी.सी. तर्फे डॉ. चंद्रशेखर दाभाडकर यांनी स्वाक्षरी केली. या सामंजस्य करारानुसार पुढील पाच वर्षात कुपोषणमुक्त दक्षिण रायगड करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये भारतीय बालरोगतज्ञ संघटना तीव्र व मध्यम कुपोषित बालकांची मोफत तपासणी करून जिल्हा परिषद आरोग्य विभाग व एकात्मिक बाल विकास योजना यांच्या वतीने आवश्यक औषधोपचार करण्यात येणार आहे. स्वदेस फौंडेशनच्या वतीने अंगणवाडी सेविका,आशा व आरोग्य कर्मचारी यांना कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशिक्षण व आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. याप्रसंगी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी हा प्रकल्प रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यातील कुपोषणमुक्तीसाठी वरदान ठरू शकेल, असा विश्वास व्यक्त केला. तर स्वदेस फौंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे यांनी कुपोषणमुक्तीसाठी स्वदेस फौंडेशन तर्फे सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. आय.आय.पी चे उपाध्यक्ष डॉ.चंद्रशेखर दाभाडकर यांनी या कार्यक्रमासाठी आय.आय.पी कडून मोफत सेवा देणार असल्याचे सांगितले.. या कार्यक्रमासाठी स्वदेश फाउंडेशनचे संचालक राहुल कटारिया, डॉ.सचिन अहिर,सुधीर वाणी व पाणी व स्वच्छता विभागाचे जयवंत गायकवाड उपस्थित होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web