वस्तू व सेवाकर बोगस विक्री बिले निर्गमित प्रकरणी न्यायालयीन कोठडीस मुदतवाढ

प्रतिनिधी.

मुंबई – महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने 23 नोव्हेंबर 2020 रोजी बोगस विक्री बिले निर्गमित करणे व त्याद्वारे 185 कोटीहून अधिक रकमेचा बोगस Input Tax Credit इतर कंपन्यांना उपलब्ध करुन देणे, या आरोपाखाली दिलीप रामगोपाल टिबरेवाल यांस अटक केली होती. आरोपीस न्यायालयाने 5 डिसेंबर 2020 पर्यंतची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या विरोधात श्री.टिबरेवाल यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज करुन आपली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा केला होता. सदर अर्जावर सुनावणी होऊन अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयाने श्री.टिबरेवाल यांचा जामीन अर्ज फेटाळला असून त्यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत दि.18 डिसेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

सदर आदेश पारित करताना न्यायालयाने, अशा प्रकारच्या गुन्ह्यात जामीन अर्जाचा विचार करताना, ‘व्यक्तिगत स्वातंत्र्य, जामीन मिळाल्यास त्याचे होणारे सामाजिक व आर्थिक परिणाम आणि तपास यंत्रणांना तपासासाठी लागणारा आवश्यक कालावधी’ या साऱ्यांचा समतोल राखणे गरजेचे असल्याचे मत नोंदविले आहे. तसेच न्यायालयीन कोठडीत असताना श्री.टिबरेवाल यांचा पुढील जबाब नोंदविण्यासाठी न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांना परवानगी दिली आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web