गांजा तस्करी करणाऱ्या तीन जणांना कल्याण पोलिसांनी ठोकल्या बेड्या

प्रतिनिधी.

कल्याण – कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण बानकर यांना माहिती मिळाली होती की, एक तरुण गांजा घेवून कल्याणमध्ये येत आहे. कल्याणच्या शिवाजी चौक परिसरात पोलिसांनी सापळा लावला. गांजा घेवून आलेल्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. रोशन पाटील असे या तरुणाचे नाव आहे.तो जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातून कल्याणला आला होता. त्याच्याकडून 1.75 किलो गांजा हस्तगत केला आहे. मात्र,रोशनने केलेला खुलासा धक्कादायक होता. रोशन हा गांजा जळगावमध्ये राहणाऱ्या उषा पाटील आणि अशोक कंजर यांच्याकडून घेत होता. सहाय्यक पोलीस निरिक्षक दीपक सरोदे यांच्या नेतृत्वात पोलिसांचे एक पथक जळगावला तपासासाठी गेले. जळगावहून अशोक कंजर आणि उषा पाटील यांना ताब्यात घेण्यात आले. उषा पाटील या महिलेचा पती या व्यवसायात होता. त्याच्या मृत्यूनंतर उषा पाटीलने हा धंदा चालवला. अशोक कंजर हा मोठा गांजा तस्कर आहे. त्याच्याकडे काही दिवसांपूर्वी 116 किलो गांजा मिळून आला होता, अशी माहिती गुन्हे निरीक्षक संभाजी जाधव यांनी दिली आहे.मध्यप्रदेशात हा गांजा 500 ते 600 रुपये किलो दराने विकत घेतला जातो. जळगावमध्ये हा गांजा 3 हजार रुपयांमध्ये विकला जातो. कल्याणात येईपर्यंत ही किंमत 13 हजार रुपये किलो होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web