कामगार गुलाम नाही, प्रसंगी त्याच्या सन्मानासाठी लढावे लागले तरी लढू – राज्यमंत्री बच्चू कडू

प्रतिनिधी.

मुंबई – कामगार हा कामगार आहे. तो गुलाम नाही. त्याचा न्याय हक्क देऊन सन्मान राखला जाणार नसेल तर त्यासाठी आपल्याला लढावे लागेल, तरी लढू,असे प्रतिपादन राज्याचे कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी येथे आंबेकर पुरस्कार प्रदान समारंभात बोलताना काढले.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने दिला जाणारा मानाचा आणि प्रतिष्ठेचा गं.द.आंबेकर जीवन गौरव पुरस्कार आज राज्याचे कामगार राज्य मंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते लढाऊ कामगार नेते विश्वास उटगी यांना तर पाच गुणवंत कामगारांना श्रम गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. परेलच्या महात्मा गांधी सभागृहात संपन्न झालेल्या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष माजीराज्यमंत्री सचिन अहिर होते.
संघटनेचे आद्य संस्थापक आणि कामगार महर्षी गं.द. आंबेकर यांच्या ५६ व्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार सोहळा कोरोनाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून संपन्न झाला. सर्व प्रथम गं.द.आंबेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून थोर कामगार नेत्याच्या स्मृतीना उजाळा देण्यात आला. एन.टी.सी.चे वरिष्ठ व्यवस्थापक किशोर पवार,आंबेकर प्रतिष्ठान कॉलेजचे प्रचार्य केतन सारंग,माजी नगरसेवक सुनिल अहिर आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघ,महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे सर्व पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते.संघटनेचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांचे कार्यक्रमाला विशेष सहकार्य लाभले.त्यांनी कार्यक्रमाला दिलेला शुभेच्छेचा संदेश वाचून दाखविण्यात आला.
कामगार राज्यमंत्री बच्चू कडू पुरस्कार प्राप्त कामगारांचा गुण गौरव करताना आपल्या भाषणात पुढे म्हणाले,कामगारांच्या हितासाठी जेजे करायचे आहे ते आपण करणार असून,त्यासाठी ‘कामगार दरबार ‘ भरविण्याची संकल्पना आहे. त्या द्वारे आपण त्यांच्या प्रश्नाना न्याय मिळवून देण्याचे काम करणार आहोत.जरूर भासेल तेथे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची मदत घेणार आहोत,असेही मंत्री महोदय म्हणाले.
जीवन गौरव पुरस्कार प्राप्त विश्वास उटगी यांच्या जवळ पास ४० वर्षे बँकींग सेवेतील निष्ठापूर्वक कार्याचा गुण गौरव करण्यात येऊन,त्यांनी केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणावर कामगार संघटना संयुक्त कृती समितीचा सहनिमंत्रक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रा भर रान पेटविले याचे विशेष कौतुक करण्यात आले
समारंभाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलताना संघटनेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री सचिनभाऊ अहिर म्हणाले,या पुरस्काराने कामगार चळवळीचा गुणगौरव झाला आहे.आघाडी सरकारमुळे, विशेषत: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री
अजितदादा पवार यांच्या कामगार हितकारक धोरणामुळे कामगारांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.गिरणी कामगाराच्या घराच्या प्रश्नावरील लढा शेवटच्या कामगाराला घर मिळे पर्यंत आम्ही चालूच ठेवणार आहोत, असेही सचिनभाऊ अहिर आपल्या भाषणात म्हणाले.
आंबेकर श्रम गौरव पुरस्कारामध्ये १)औरंगाबाद मधील बजाज ऑटोचे कामगार महेश सेवलीकर,सामाजिक,२)नाशिक मधील किमप्लास पाईपिंग कंपनीतील कामगार साहित्यिक संजय गोराडे यांना साहित्य विभागातून,३)औरंगाबदचे शासकीय मुद्राणायातील सेवानिवृत्त आणि संघटक कामगार एम.ए.गफ्फार यांना कामगार चळवळ विभागातून ४)नाशिकच्या भारतीय जीवन विमा विभागातील कामगार राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय धावपटू सौ.मोनिका आथरे यांना क्रीडा विभागातून तर ५)रायगड मधील रिलायन्सचे कामगार कलावंत मकरंद नाईक,यांना कला विभागातून गौरविण्यात आले.
शाल,श्रीफळ,स्मृती चिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून,सोबत जीवन गौरवला रु ४१हजार तर , पाच श्रम गौरव सन्मानित कामगारांना प्रत्येकी रू.३० हजार चा धनादेश प्रदान करण्यात आला.विश्वास उटगी यांनी आपल्या आभाराच्या तडाखेबाज भाषणात सांगितले, की कामगारांच्या प्रश्नावरील लढा आपण असाच चालू ठेवणार आहोत.
या प्रसंगी संघटनेत ४६ वर्षे निष्ठेने कार्यरत असलेले उपाध्यक्ष रघुनाथ उर्फ अन्ना शिर्सेकर यांचा अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सन्मानपत् देऊन गुण गौरव करण्यात आला.गिरणी कामगारांच्या इयत्ता दहावी, बारावी उत्तीर्ण मुलांचा आंबेकर स्मृती शैक्षणिक सहाय्याने गुण गौरव करण्यात आला.प्रस्ताविक खजिनदार निवृत्ती देसाई यांनी केले तर आभार उपाध्यक्ष सुनिल बोरकर यांनी मानले,सुत्रसंचालन उपाध्यक्ष बजरंग चव्हाण व स्मिता गवाणकर यांनी केले.पुरस्कार निवड समितीवर आंबेकर श्रम संशोधन संस्थेचे सल्लागार डॉक्टर शरद सावंत, संचालक जी.बी.गावडे, केंद्रीय शिक्षण बोर्डाचे,उपसंचालक प्रदीप मून,मणीबेनकारा इन्स्टिट्यूटचे संचालक राजेंद्र गिरी,प्रसिद्धी प्रमुख आणि कथालेखक काशिनाथ माटल यांनी काम पाहिले.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web