पर्यावरण विभाग, बीएमसी व सी ४० सीटीज हवामान नेतृत्व गट यांच्यामध्ये सामंजस्य करार

प्रतिनिधी.

मुंबई – राज्याचा पर्यावरण विभाग, मुंबई महापालिका आणि सी 40 सीटीज हवामान नेतृत्व गट यांच्यामध्ये राज्याचे पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी करारावर स्वाक्षरी केली.

सी 40 सिटी हवामान नेतृत्व गटाचे कार्यकारी संचालक श्री. मार्क वॅट्स, सी 40 सीटीजच्या दक्षिण आणि पश्चिम आशियाच्या क्षेत्रीय संचालक श्रीमती श्रुती नारायण ऑनलाईन सहभागी झाल्या होत्या. राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सुधीरकुमार श्रीवास्तव, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती मनिषा म्हैसकर, सी 40 सीटीज उपप्रादेशिक संचालक दिव्य प्रकाश व्यास, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे आदी यावेळी उपस्थित होते.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबई शहरात वाहतूक व्यवस्थापनासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले असून यामुळे वाहतुकीचा वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. घनकचऱ्याचे विभाजन, सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. शहरातील आरे येथील सुमारे ८०० एकर जागा राखीव वन म्हणून जाहीर करण्यात आली आहे. राज्यात इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरास चालना देण्यात येत आहे. कार्बन फूटप्रींटस् कमी करण्यासाठी व्यापक कार्यवाही करण्यात येत असल्याचे श्री.ठाकरे यांनी सांगितले.

सी 40 शहरे हवामान नेतृत्व गटाचे कार्यकारी संचालक मार्क वॅट्स म्हणाले की, सी -40 शहरांच्या हवामान नेतृत्व समूहाच्या वचनबद्धतेची मुंबई शहर पुष्टी करीत आहे, हे पाहून आनंद वाटला. पर्यावरण रक्षणासाठी जगभरात होत असलेल्या विविध उपक्रमांची मुंबईत अंमलबजावणी करता येईल, असे त्यांनी सांगितले.

दक्षिण आणि पश्चिम आशियाच्या विभागीय संचालक श्रीमती श्रुती नारायण म्हणाल्या की, आम्ही मुंबईसमवेत काम करण्यास उत्सुक आहोत. पर्यावरणासंदर्भात भरीव कार्य करुन मुंबई केवळ भारतातीलच नव्हे तर प्रादेशिक आणि जागतिक स्तरावरही इतर शहरांसाठी एक उदाहरण उभे करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सामंजस्य करारानुसार हवामान बदलाच्या परिणामांवर मात करण्यासाठी वचनबद्ध असलेल्या जगातील सर्वात मोठ्या शहरांचे जागतिक नेटवर्क असलेल्या सी 40 च्या ध्येयाशी मुंबई शहर वचनबद्ध झाले आहे. सी 40 सीटीज ग्रुप हा हवामान बदल रोखण्याविषयक ठाम कृती करण्यासाठी जगातील 97 मोठी शहरे जोडतो. निरोगी आणि अधिक शाश्वत भविष्याकडे वाटचाल करण्याचे या शहरांचे ध्येय्य आहे.  700 दशलक्षाहून अधिक नागरिक आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या एका चतुर्थांश भागाचे प्रतिनिधित्व करीत सी 40 शहरे स्थानिक पातळीवर हवामान बदलाच्या प्रश्नावर तसेच हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी महत्वाकांक्षी कृती करण्यास वचनबद्ध आहेत.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web