कल्याण – कोरोना पार्श्वभूमीवर लाँकडाऊन नंतर तब्बल नऊ महिन्यानंतर कल्याणातील आचार्य अत्रे रगंमंदिराची दारे नाट्य रसिक प्रेक्षक वर्गासाठी शनिवारी दुपारी साडे चारच्या सुमारास ‘तु म्हणशील तसं’ या नाटकाच्या पहिला वहिला शुभारंभ प्रयोगाने उघडण्यात आली. मुंबई ठाण्या पाठोपाठ कल्याण डोंबिवलीतील नाट्यगृह खुली करण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी नुकताच घेतला होता.
आयुक्तांच्या या निर्णयानंतर शनिवारी कोरोना लाँकडाऊन संकटाच्या तब्बल नऊ महिन्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले निर्मित, प्रसाद ओक दिग्दर्शित आणि संकर्षण कऱ्हाडे व भक्ती देसाई अभिनित ‘तू म्हणशील तसं’ या नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाने अत्रे रंगमंदिर येथुन सुरूवात झाली. शनिवारी होणाऱ्या या पहिल्या नाटकाच्या प्रयोगासाठी अत्रे रंगमंदिर सज्ज करण्यात आले होते. कोरोना पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून नाट्यप्रयोग सुरू करण्यात आला तर २० डिसेंबरला डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृहं देखील पुन्हा नाट्य रसिकांच्या सेवेत रुजू होणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अत्रे रंगमंदिरातील आसनव्यवस्थेमध्ये बदल करण्यात आले असून एक खुर्ची सोडून एक प्रेक्षक बसेल अशाप्रकारे बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक प्रयोगानंतर नाट्यगृह सँनिटायज करण्यात येणार आहे. कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे आयुक्त डाँ. विजय सूर्यवंशी सपत्नीक शनिवारी ‘तू म्हणशील तसं’ या नाटकांच्या शुभारंभाच्या प्रयोगाला उपस्थित होते. याप्रसंगी आयुक्त डाँ विजय सूर्यवंशी म्हणाले की, नऊ महिनाच्या प्रतिक्षेनंतर नाट्यगृहाचा पडदा उघडणारे आचार्य अत्रे रगंमंदिर एम्एम्आर् रिजन मधील पहिले नाट्य गुह असुन ‘तू म्हणशील तसं’ या नाट्य प्रयोगाचा शुभारंभ कोरोना लाँकडाऊन नंतर सुरू झाल्यामुळे या नाटकाची इतिहासात नोंद होईल. नियमांचे पालन करीत नाट्य रसिक प्रेक्षकांनी नाटकांचा आनंद घ्यावा. या दरम्यान नाट्य प्रयोग सुरु होण्याआधी नाटकातील मुख्य कलाकार संकर्षण कह्राडे यांनी आयुक्तांना पुष्प गुच्छ देत आयुक्ताचे आभार मानले. यावेळी अत्रे रंगमंदिराचे प्रभारी व्यवस्थापक माणिक शिंदे, सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचे प्रभारी व्यवस्थापक दत्तात्रय लदवा यांच्यासह कर्मचारी वर्ग उपस्थित होता. हा पहिला वहिला नाट्य प्रयोग बघण्यासाठी सर्व नियमांचे पालन करत रसिक प्रेक्षकांची उपस्थिती लक्षणीय होती.