प्रशिक्षण शिबिरातून स्थानिकांना पोलीस विभागात दाखल होण्याची सुवर्णसंधी

नागपूर – ग्रामीण भागातील तरुण -तरुणींना तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण माहिती मिळावी, या हेतूने पोलीस भरती पूर्वतयारी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, राज्य शासनाच्या पोलीस भरतीमध्ये जास्तीत-जास्त स्थानिक युवक-युवतींची निवड व्हावी. यासाठी सर्वांनी कठोर परिश्रम करण्याचे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.

काटोल व कोंढाळी येथे आज त्यांच्याहस्ते पोलीस भरती पूर्वतयारी प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी गृहमंत्र्यांच्या सुविद्य श्रीमती पत्नी आरती देशमुख, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) राकेश ओला, उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर, उप विभागीय पोलीस अधिकारी नागेश जाधव, सुभाष कोठे, सतीश रेवतकर, नरेश अडसरे आदी उपस्थित होते.

आज कोंढाळी व काटोल येथे शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. त्यासोबतच नरखेड, भारसिंगी आणि थडीपवनी या ठिकाणी भरतीपूर्व तयारी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. यामुळे प्रत्यक्ष पोलीस भरती प्रक्रियेची माहिती होईल. पोलीस विभागात निवड होताना या शिबिराचा लाभ होईल. पोलीस भरती प्रक्रियेमध्ये 30 टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत, याचा मुलींना लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

कोरोना महामारीमुळे राज्याची आर्थिक स्थिती चांगली नाही. तरीही राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या अटी व शर्तींचे पालन करून राज्यात साडेपाच हजारापेक्षा जास्त जागांवर पोलीस शिपाई भरती करण्याचे नियोजन केले. त्या भरती प्रक्रियेत स्थानिक युवक व युवतींचा सहभाग वाढावा. त्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य पोलीस दलात निवड होण्यासाठी मैदानी आणि लेखी परीक्षेची उत्तम तयारी करा. जिद्द, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवा आणि पोलीस दलात निवड होण्यासाठी हीच सुवर्णसंधी आहे. त्या संधीचे सोने करण्याचे आवाहनही श्री. देशमुख यांनी केले.

राज्यातील पोलीस दलात साडेबारा हजार पदांची भरती करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात 5 हजार 298 जागा भरल्या जाणार असल्याचे ते म्हणाले.

महाराष्ट्र पोलीस दलाने कोरोनाकाळात उत्तम काम केल्याचे सांगून या काळात 296 पोलीस शहीद झाल्याचे त्यांनी सांगितले. आता साडेबारा हजार पोलीसांची भरती करण्यात येणार आहे. 100 एकर जागेच्या  परिसरात इसासनी येथे शासकीय जागा मिळाली आहे. काटोल, नरखेड, कोंढाळी आणि बाजारगाव पोलीस ठाण्याची कामे करण्यात येणार आहेत. नागपूरची मेट्रो आगामी काळात काटोल – नरखेडपर्यंत सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शक्ती कायद्याचे प्रारुप तयार करण्यात आले असून, या कायद्याच्या माध्यमातून महिलांच्या संदर्भातील गंभीर गुन्ह्यासंदर्भासाठी दोषीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील मुली -महिला सुरक्षित वावरतील, असा विश्वास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केला.

राज्यात आगामी काळात होणा-या पोलीस भरतीमध्ये मोठ्या प्रमाणावर निवड होण्यासाठी कठोर परिश्रम घेण्याची तयारी ठेवा. आता या शिबिरात सराव करण्याचे आवाहन करून उपस्थित युवक – युवतींना श्रीमती आरती देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पुढाकाराने पूर्व तयारी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे येथील युवकांच्या पालकाची जबाबदारी ते पार पाडत आहेत. मुलांनी आयुष्यात ध्येय निश्चित करणे आवश्यक असून, त्यांनी युवकांना ध्येय निश्चित करून दिले आहे. ते गाठण्यासाठी प्रशिक्षणार्थींनी प्रयत्न करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी केले. पोलीस भरती प्रक्रियेबाबत मैदानी व लेखी परीक्षेबाबत माहिती दिली.

जिद्द, चिकाटी आणि परिश्रम करण्याची तयारी ठेवा, संपूर्ण ताकदीने तयारीला लागा. तुमची पूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे. जबाबदारी तुमची आहे.  आता नाही तर कधीच नाही असा निर्धार करून यावर्षी होणा-या पदभरती निवड होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन उप विभागीय पोलीस अधिकारी नागेश जाधव यांनी केले. प्रशिक्षक शिबिरात वाय. एम. मडावी, ए. एम. रामटेके, ए. यू.पवार , एस. बी. कुथे, बी. एस. शुक्ला, अक्षय ठाकरे, मनीष ठाकरे, प्रवीण टोंग, माणिक उसंडी, विजय कुंभलकर, गुरुदेव खोब्रागडे, गणेश चौके, प्रसाद रुचके, राहुल तायडे, नितीन सोनटक्के, श्रीधर झाडे व चंद्रशेखर मसराम असे एकूण 20 प्रशिक्षक प्रशिक्षण देणार आहेत.

मराठा लॉन्सर्स, विदर्भ युथ क्रीडा मंडळ व राजूज जिम, काटोल आणि कोंढाळी येथे साहस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर सुरु करण्यात आले आहे.

कोंढाळी येथे 550 आणि काटोल येथे 610 अशी एकूण 1 हजार 160 जणांनी प्रशिक्षणासाठी नावनोंदणी केली असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web