कल्याण खाडीमध्ये आढळलेल्या दोन चिमुकल्यांचा वडिलांचा शोध लागला

प्रतिनिधी.

डोंबिवली – कल्याण कचोरे खाडीलगत सोमवारी सापडलेल्या दोन लहान मुलांच्या वडिलांचा शोध लागला आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी ही लहान मुले सापडली त्याच ठिकाणी या मुलांच्या आईचा फोन आणि चप्पल सापडली आहे. यावरून मुलांच्या आईने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.अठरा महिन्याचा स्नेहांश आणि तीन महिन्याचा ‌आयांश असे या मुलांची नावे असून शुभ्रत शाहू असे त्यांच्या वडिलांचे नाव आहे. आईचे नाव रत्नमाला शाहू असे असून अद्यापही आईचा शोध सुरु असल्याची माहिती विष्णुनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय साबळे यांनी दिली.

गेल्या आठ महिन्यापासून कोरोनामुळे पार्लरचा व्यवसाय ठप्प झाल्याने रत्नमाला शाहू या डिप्रेशन मध्ये होत्या.तर शुभ्रत शाहू यांची कोरोनामुळे नोकरी सुटली होती. त्यामुळे दुधाच्या पिशव्या टाकण्याचा व्यवसाय तात्पुरत्या स्वरूपात ते करत होते. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे शुभ्रत दूध टाकण्यासाठी गेला. त्यांनतर तेथूनच दुचाकी गाडीचा इन्शुरन्ससाठी तो कार्यालयात गेला. तिथून घरी आल्यानंतर घराला कुलूप लावलेले त्यांनी पाहिले. कुलूप उघडून घरी बनवलेले जेवण जेवून पुन्हा शुभ्रात कामावर गेला.त्यावेळी आपली पत्नी मुलांना घेऊन नेहमीप्रमाणे पार्लरला गेली असेल असा अंदाज त्यांनी काढला. रात्री घरी आल्यानंतरही घराला कुलूप होते.पण कधी कधी टेन्शन आल्यानंतर ती मैत्रिणीकडे जाते त्यामुळे ती मैत्रिणीकडे गेली असेल असे त्यांना वाटले. शोधाशोध करुनही पत्नी सापडली नाही. दुसऱ्या दिवशी पोलिसांचा फोन गेल्यानंतर शुभ्रत विष्णूनगर पोलिस ठाण्यात आला त्यावेळी त्याला सर्व हकीकत समजली. मात्र अद्यापही पत्नी आत्महत्या करणार नाही असेच त्याचे म्हणणे आहे.आत्महत्या केल्याचा कोणताही सबळ पुरावा नसला तरी पोलिसांनी प्रथम दर्शनी पाहता आत्महत्या असल्याचे सांगितले.तर डोंबिवलीत लहान मुलांचा सांभाळ करणाऱ्या जननी आशिष या सामाजिक संस्थेत या मुलांची रवानगी सोमवारी रात्री करण्यात आली आहे. ही मुले सध्या विलगिकरण कक्षात ठेवली असून दोन्ही मुलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जननी अशिशच्या प्रतिनिधींनी दिली. तर मुलांची त्यांच्या वडिलांबरोबर ओळख परेड केली जाईल आणि नंतर मुलांना वडिलांकडे सोपविण्यात येईल अशी माहिती विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस साबळे यांनी दिली

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web