प्रतिनिधी.
अंबरनाथ – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज (रविवार) 64 वा महापरिनिर्वाण दिन. भीम अनुयायी विविध प्रकारे बाबासाहेबांना आजच्या दिवशी आदरांजली वाहत आहेत. अंबरनाथमध्ये वंचितकडून बाबासाहेबांना अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहण्यात आली. वंचितने रक्तदान शिबिराचं आयोजन करुन बाबासाहेबांना आदरांजली अर्पित केली.दरवर्षी महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर लाखो अनुयायी जमतात.
मात्र यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चैत्यभूमीवर अनुयायांनी येऊ नये असं आवाहन करण्यात आलं. त्यामुळे बाबासाहेबांना घरी आणि आपापल्या परिसरातील बुद्ध विहारात अभिवादन करण्यात आलं. वंचित बहुजन आघाडीने बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं.अंबरनाथ वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते प्रवीण गोसावी यांनी हे शिबीर आयोजित केलं होतं. अंबरनाथच्या महालक्ष्मी नगर भागातील आम्रपाली बुद्ध विहारात हे शिबीर पार पडलं. यावेळी अनेक जणांनी रक्तदान केलं.कोरोनामुळे रक्ताचा तुटवडा भासत असून रक्तदान करण्याचं आवाहन केलं जातंय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच सरकारमधील अनेक मंत्र्यांनी राज्यातील जनतेने स्वयंस्फूर्तीने रक्तदान करावं, असं आवाहन करत आहेत. त्याच अनुषंगाने बाबासाहेबांना अभिवादन म्हणून हे शिबीर आयोजित केल्याचं प्रवीण गोसावी यांनी सांगितलं
