मंडप व्यवसायाच्या आड गांजा विक्रीचा धंदा, छापेमारी करत १०किलो गांजा जप्त पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

कल्याण : कल्याण मधील मोठ्या हुशारीने क्लुप्त्या वापरून मंडप व्यवसायाच्या आड गांजा विक्रीचा धंदा करणाऱ्याला कल्याण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मोहसीन पठाण असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या व्यक्तीकडून  मोठ्या शिताफीने कल्याण बाजारपेठ पोलिसांनी दहा किलो गांजा जप्त केला आहे.
 कल्याण पश्चिमेतील मदार छल्ला परिसरात राहणारा ३७ वर्षीय मोहसीन पठाण हा मंडप व्यवसायिक आहे. त्यासोबतच त्याने गांजा विक्रीचा धंदा सुरू केला आहे, अशी माहिती पोलीस कर्मचारी आसिफ अत्तार यांना मिळाली होती. त्यानंतर आसिफ अत्तार यांनी ही माहिती आपल्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिली.
यानंतर बाजारपेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पीआय यशवंत चव्हाण यांनी पोलीस अधिकारी प्रमोद सानप, पोलीस कर्मचारी आसिफ अत्तार, गणेश भोईर, सतीश सोनवणे, प्रवीण देवरे, नाना चव्हाण, जुम्मा तळवी यांनी एक पथक तयार केले. पोलिसांच्या या पथकाने मोहसिनच्या घरावर छापा टाकला. या छाप्यादरम्यान मोहसीन हा घरातील एका रुममध्ये छोट्या छोट्या पिशवीत गांजा भरत होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून दहा किलो गांजा जप्त केला आहे.
मोहसीन अब्दुल रज्जाक पठाण याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. तो मंडप व्यावसायाच्या आड गांजा विक्रीचा धंदा करत होता. मोहसीन पठाण हा व्यक्ती गेल्या कित्येक दिवसापासून गांजा विक्री करतो. तो कोणाकडून गांजा विकत घेतो, किती लोकांना विकतो? याचा सध्या तपास सुरु आहे.
कल्याण कोर्टाने मोहसीन याला ८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. एका मंडप व्यवसाय करणारा व्यक्ती गांजा विक्री चा धंदा करत असल्याचे उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web