महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीचे कोरोना नियंत्रण उपायांमध्ये विशेष प्रकल्प

प्रतिनिधी.

मुंबई – कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत कोरोना नियंत्रण उपायांमध्ये विशेष प्रकल्प हाती घेतले आहेत. विविध कॉर्पोरेट, स्टार्टअप्स, सामाजिक संस्थांसमवेत भागीदारी करत जिल्हा स्तरावर विविध आव्हानांवर मात करण्यासाठी नाविन्यपूर्ण प्रकल्प राबविण्यात येत आहेत. आतापर्यंत एसीटी ग्रँट्सच्या (ॲक्शन कोव्हीड – १९ टीम) माध्यमातून सुमारे ५.८५ कोटी रुपयांची मदत राज्यातील जिल्ह्यांना करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या माध्यमातून एसीटी ग्रँटस् समर्थित कंपन्यांनी होम आयसोलेशन, ऑक्सिजन थेरपी, टेली आयसीयू आणि मानसिक स्वास्थ्य या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात यशस्वीरित्या प्रकल्प सुरू केले आहेत. हे प्रकल्प मुंबईसारख्या मोठ्या शहरांपासून लहान शहरे व खेड्यांपर्यंत सुरु आहेत. महाराष्ट्रात मुख्यतः क्लाऊड फिजीशीयन, स्प्रिंगर हेल्थ, स्टेप वन, ईसायक्लिनीक, एचएफएनसीज आणि टेली-आयसीयू अशा कंपन्यांचे प्रकल्प राबविण्यात येत आहेत.

मुंबई, पुणे, सातारा आणि सांगली या ठिकाणी लक्षणे विरहीत रुग्णांसाठी होम आयसोलेशन केंद्रे उभारण्यात आली आहेत. तसेच येत्या काही दिवसात औरंगाबाद व नागपूर येथे लक्षणे विरहित रुग्णांसाठी होम आयसोलेशन केंद्रे उभारण्यात येणार आहेत. ऑक्सिजन थेरपी सौम्य किंवा मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी ऑक्सिजन फेसमास्कद्वारे वापरली जातात. एसीटी अनुदानाद्वारे पुणे येथे सुमारे २० एचएफएनसी आणि नाशिक व ठाणेमध्ये प्रत्येकी २० एमएफएनसी उपकरणे पुरविण्यात आली आहेत. तसेच अनुदानाद्वारे 250 डी टाईप ऑक्सिजन सिलेंडर आणि 50 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्सही पुरविण्यात आले आहेत.

कांदिवली, भिवंडी, नाशिक, अकोला, सांगली, इस्लामपूर आणि जळगाव यासह राज्यातील विविध ठिकाणी २०० हून अधिक बेड्सकरिता टेली आयसीयू बेडस् ची सुविधा पुरविण्यात आली.

तणाव आणि चिंताग्रस्त नागरिकांचे सामाजिक स्वास्थ्याचे संकटाचा सामना करण्यासाठी हेल्पलाइन सुरू करण्याचा एसीटी ग्रँटस्चा उपक्रम राबविण्यात आला. ईसायक्लिनिक या स्टार्टअपद्वारे पुणे, मीरा भाईंदर, नागपूर आणि नाशिक या जिल्ह्यात मेंटल वेलनेस सोल्युशन सुरू करण्यात आले असून त्याचा फायदा नागरिकांना होत आहे.

सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव तथा कौशल्य विकास विभागाच्या तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक म्हणाल्या की, राज्यातील विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्र महत्त्वपूर्ण प्रगती करत आहे. वेगवेगळ्या उपाययोजना राबविण्यात आणि दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्यात एसीटी अनुदानाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. व्हेंचर कॅपिटल्स आणि  देशातील स्टार्टअप्सच्या भागीदारीने एसीटी ग्रँट्स हा एक अत्यंत कार्यक्षम प्रयत्न आहे आणि महाराष्ट्र शासनास आवश्यकता असलेल्यांना मदत करण्यासाठी या भागीदारीची खूप मदत होत आहे.

नेक्सस व्हेंचर पार्टनर्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि एसीटी ग्रँट्सचे प्रवक्ते श्री. संदीप सिंघल म्हणाले की, वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेत शासनाला मदत करणे हा एसीटी ग्रँट्स योजनेचा मुख्य उद्देश होता. सुरू केलेला प्रकल्प यशस्वी झाला आहे. प्रभावित भागात अधिकाधिक लोकांना सेवा उपलब्ध करून देण्याची इच्छा आहे. यासाठी महाराष्ट्र शासनासोबत आम्ही भागीदारी पुढे चालू ठेवू.

एसीटी ग्रँट्सबाबत

एसीटी ग्रँट्स हे कोविड-१९ च्या विरुद्ध त्वरित प्रभावाने लढा देऊ शकणाऱ्या कल्पनांना चालना देण्यासाठी व्हेंचर कॅपिटल्स आणि स्टार्टअप्सच्या भागीदारीने १०० कोटी रुपयांचे अनुदान आहे. एसीटी म्हणजे ॲक्शन कोव्हीड – १९ टीम. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी स्केलिंग चाचणी, रोगप्रबंधन, आरोग्यसेवा कर्मचारी व रुग्णालयांना वाढीव पाठबळ, गंभीर आजार असलेल्या रुग्णांचे व्यवस्थापन, मानसिक आरोग्यासाठी काम करणाऱ्या स्टार्टअप्सना समर्थन करण्यात येते, अशी माहिती नाविन्यता सोसायटीमार्फत देण्यात आली आहे

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web