आदिवासी विकास विभागातर्फे ‘गणित माझा सोबती’स्पर्धेचे आयोजन

प्रतिनिधी.

नाशिक – भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या 125 व्या जन्मदिनानिमित्त सन 2012 पासून 22 डिसेंबर हा राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी अनेक शाळांमधून हा दिवस साजरा केला जातो. आदिवासी विकासमंत्री अॅड. के.सी. पाडवी, आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि सचिव आदिवासी विकास अनुपकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखालीआदिवासी विकास विभागाने यावर्षी सर्व शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा आणि एकलव्य निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‘गणित माझा सोबती’ या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

विद्यार्थ्यांना गणित हा विषय क्लिष्ट आणि अवघड वाटतो. विद्यार्थ्यांना गणित विषय सोपा वाटावा यादृष्टीने सर्व शिक्षक बांधव नेहमीच प्रयत्न करत असतात. सध्या शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरी आहेत. केवळ 9 वी ते 12 वी च्या शाळा काही ठिकाणी सुरु आहेत. त्यामुळे यंदा गणित विषयक विविध उपक्रम शाळेत घेता येणार नाहीत. याच पार्श्वभूमीवर स्पर्धेत विद्यार्थी घरून सहभाग घेऊ शकणार आहेत. दैनंदिन जीवनात आपण अनेक ठिकाणी गणिताचा वापर करतो. उदा. सकाळी किती वाजता उठायचे? यापासून गणित आपल्या जीवनात असते. हाच मुद्दा लक्षात घेऊन ‘दैनंदिन जीवनातील गणित’ या विषयावर दोन गटात स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेचे प्रकल्पनिहाय आणि अपर आयुक्तालयानिहाय शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा आणि एकलव्य निवासी आश्रमशाळा या प्रकारानिहाय प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे क्रमांक काढण्यात येणार आहेत. राज्यस्तरावर मात्र प्रथम, द्वितीय आणि तृतीय या व्यतिरिक्त दोन उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत.

असे असतील स्पर्धेचे वयोगट आणि विषय

गट 1 हा प्राथमिक विभागाकरिता असून इयत्ता 5 वी ते 8 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असेल. या गटातील विद्यार्थ्यांनी ‘दैनंदिन जीवनातील गणित’ या विषयावर चित्र सादर करावयाचे आहे. गट 2 हा माध्यमिक विभागाकरिता असून इयत्ता 9 वी ते 12 वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असेल. या गटातील विद्यार्थ्यांनी ‘दैनंदिन जीवनातील गणित’ या विषयावर 250 ते 300 शब्दात निबंध सादर करावयाचे आहे. विद्यार्थ्यांनी शाळेमार्फत चित्र आणि निबंध हे दि. 10 डिसेंबर 2020 पर्यंत सादर करावयाचे आहेत, अशी माहिती आदिवासी विकास विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

‘या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल. दैनंदिन जीवनात गणित कसं आणि कुठे वापरतो याबाबत चित्र काढणे आणि निबंध लिहिणे याद्वारे बौद्धिक चालनाही मिळेल. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी यात सहभाग घ्यावा, असे आवाहन आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी केले आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web