नाशिकच्या धर्तीवर बॉटनिकल गार्डनचा प्रयत्न करणार – मनसे आ.राजू पाटील

प्रतिनिधी.

डोंबिवली – डोंबिवली परिसरामधील मौजे धामटण, दावडी , उंबार्ली, हेदुटणे भागात महाराष्ट्र वनविभागाच्या अखत्यारीतील वन आहे. त्यापैकी उंबार्ली पक्षी अभयारण्य म्हणून ओळखले जाते. येथे खाजगी संस्थाकडून वृक्षरोपण मोहीम राबविण्यात येते. आज मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पर्यावरण प्रेमींसोबत पर्यावरणास होत असलेल्या अडचणी आणि समस्यांची माहिती घेतली आहे.उंबार्ली , हेदुटने, दावडी या परिसरात विविध पक्षी, किटक, फुलपाखरे, साप , सरपटणारे प्राणी आणि विविध प्रकारची वृक्षसंपदा आहे. हा परिसर डोंबिवली शहराचा फुप्फुस असून ऑक्सिजन झोन म्हणून ओळखला जातो, याच जंगलावर सध्या माफियांची सध्या नजर पडली आहे. बाजूलाच उंबार्ली येथे गृहनिर्माण प्रकल्पाच्या नावावर जंगलाचा ऱ्हास सुरु आहे. मोठमोठे क्रशर व मशिनरी लावून खोदकाम सुरु आहे. तसेच दरवर्षी या जंगलाला आगी लावण्यात येतात. काहीवेळा डोंगरावर रासायनिक पदार्थ टाकून निसर्गाची हानी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मुंबईसाठी ‘आरे ‘ जंगलाचे जेवढे महत्व आहे. तेवढेच कल्याण डोंबिवलीसाठी ‘उंबार्ली’ आणि परिसराचे आहे. जंगलाचे अस्तिव टिकवायचे असेल तर पर्यावरण पुरक प्रयत्न करायला हवेत. यासाठी येथील पर्यावरणासाठी धोकादायक ठरणाऱ्या बाबींची चौकशी करण्याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी पर्यावरण मंत्री व वनमंत्री यांना पत्र देऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्याच बरोबर या जंगलाचे योग्य संवर्धन करायचे असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नाशिक महानगरपालिका सत्ता असताना पांडवलेण्याचा पायथ्याशी असलेल्या पंडित जवाहलाल नेहरू वनोद्यान टाटा ट्रस्टच्या वतीने विकसित केले आहे. आज हे गार्डन पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक येतात आणि दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न महानगरपालिकेला मिळते. त्याच धर्तीवर निसर्गसंपदेने नटलेल्या मौजे धामटण येथे बोटॅनिकल गार्डन बनविण्याची परवानगी द्यावी अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी वनमंत्र्याकडे केली. बोटॅनिकल गार्डन बनविण्यासाठी विविध कंपन्या सीएसआर फंड वापरण्यास तयार आहेत.फक्त शासनाने इच्छाशक्ती दाखवून गार्डन बनविण्याची परवानगी दिल्यास उत्कृष्ट गार्डन निर्माण होईल व पर्यावरण संवर्धन तसेच महानगरपालिकेला उत्पन्नाचे साधन होईल अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी निसर्ग वाचवण्याच्या लढ्यात असलेले पर्यावरण प्रेमी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये ॲडव्हेंचर इंडिया, गिरिमित्र प्रतिष्ठान, निवासी विभाग प्रतिष्ठान, स्वयंम् चॅरीटेबल ट्रस्ट, कें. वि. पेंढारकर कॉलेज माजी एनसीसी विद्यार्थी संघ, तसेच ग्रामस्थ देखील उपस्थित होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web