दैवत विश्रामगृहाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

प्रतिनिधी.

अलिबाग – स्थानिक लोकाधिकार समितीने विविध उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ तयार करण्याचे काम हाती घ्यावे, त्यासाठी समर्पित आणि अद्ययावत अशी कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था स्थापन करावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

 भारतीय विमा कर्मचारी संघटना आणि स्थानिक लोकाधिकार समिती यांच्या संयुक्त प्रयत्नातून अलिबाग येथील वरसोली गावात न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे “दैवत” नावाचे विश्रामगृह बांधण्यात आले असून आज त्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे सीएमडी अतुल सहाय, खासदार अनिल देसाई, स्थानिक लोकाधिकार समितीचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या वाढीत स्थानिक लोकाधिकार समितीचे योगदान खूप मोठे आहे. महाराष्ट्रीयन माणसाला विशेषत: मराठी माणसाला त्याचा हक्काचा रोजगार मिळवून देण्यासाठी स्थानिक लोकाधिकार समितीने जो संघर्ष केला त्यातून आज कंपनीमध्ये मराठी माणसाचा टक्का वाढलेला दिसून येत आहे.

करोनाच्या प्रादूर्भावामुळे आज आपल्यासमोर अनेक अडचणी निर्माण केल्या असल्या तरी अनलॉक प्रक्रियेमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक उद्योग क्षेत्रात झाल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे सीएमडी अतुल सहाय यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी विविध क्षेत्रातील गुंतवणूकदार महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास इच्छुक असल्याचे सांगताना शासन यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. . या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन खासदार अनिल देसाई यांनी केले.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web