शहीद जवान भूषण सतई यांना लष्करातर्फे मानवंदना

नागपूर – जम्मू काश्मीरमध्ये शहीद झालेले काटोलचे सुपुत्र शहीद नायक भूषण सतई यांना कामठी येथील ब्रिगेड ऑफ गार्ड रेजिमेंटच्या गरुडा परेड ग्राऊंडवर अखेरची मानवंदना देण्यात आली.

राज्य शासनातर्फे राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी शहीद भूषण सतई यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली अर्पण केली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. शहीद भूषण सतई हे मुळचे काटोलचे असून त्यांच्यावर  लष्करी इतमामात काटोल नगरीत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.

उत्तर महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सैन्य विभागाच्या सब एरियाचे प्रमुख मेजर जनरल दिनेश हुड्डा यांनी अभिवादन केले. सैन्यदलाच्या विशेष पथकाकडून पारंपरिक  धुन वाजवून व सशस्त्र दलातर्फे यावेळी ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला. सेनादलाचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांनी वीरपुत्राला श्रध्दांजली वाहिली.

ब्रिगेडीयर संदीप कुमार, ब्रिगेडीयर दीपक शर्मा, उपमहापौर श्रीमती मनिषा कोठे, कमांडर अलोक बेरी, आर. बी. बिराजदार यांचेसह जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर आदींनी पुष्पचक्र अर्पण केले.

खोऱ्यातील गुरेज सेक्टरमध्ये मागील शुक्रवारी पाकिस्तानने केलेल्या हल्यात भारतीय लष्काराचे चार जवान शहीद झाले होते. यामध्ये काटोल येथील भूषण रमेश सतई यांना वीरमरण आले. कामठी येथील लष्करी हॉस्पिटलमधून शहीदाचे पार्थिव सेनादलाच्या गरुडा परेड येथील अमर योध्दा स्मारकाजवळ ठेवण्यात आले. यावेळी सेनादलाकडून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर वीर सुपुत्राचे पार्थिव त्यांच्या मुळगावी काटोल येथे संपूर्ण सन्मानपूर्वक रवाना झाले यावेळी शहीद सुपुत्राचे निकटवर्तिय उपस्थित होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web