प्रतिनिधी.
कल्याण – कल्याण पूर्व – पश्चिमेला जोडणाऱ्या नविन पत्री पुलाच्या अंतिम टप्प्यातील आणि सर्वात महत्वाचा भाग असलेल्या पुलाच्या ७०० मेट्रिक टन वजनाच्या आणि ७६.६ मीटर लांबी असलेल्या गर्डरच्या प्रत्यक्ष उभारणीच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाकडून लवकरात लवकर मेगा ब्लॉक मिळावा अशी आग्रही मागणी आज मध्य रेल्वे महाप्रबंधक श्री.संजीव मीत्तल यांच्या दालनात आयोजित बैठकीत केली. या बैठकीस मध्य रेल्वे डी.आर.एम श्री.शलभ गोयल, एम.एस.आर.डी.सी. अधिकारी श्री.सोनटक्के, राईट्स संस्थेचे अधिकारी उपस्थित होते. रेल्वे हेडकॉर्टस व सेंट्रल रेल्वे बोर्डाकडून या मागणीस तात्काळ मान्यता मिळाली असून गर्डर उभारणीच्या कामासाठी २१ व २२ नोव्हेंबर रोजी दोन्ही दिवस ४ तासांचा मेगा ब्लॉक मंजूर करण्यात आला आहे.
गर्डर लाँचिंग झाल्यानंतर गर्डर उभारणीचे काम ९० टक्के पुर्ण होणार असून २७ व २८ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या वेळीस मेगा ब्लॉक घेऊन उर्वरित काम पूर्ण केले जाणार आहे.महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ७६.६ मीटर लांबी असलेल्या या नविन पत्री पुलाच्या गर्डर उभारणीचे मॉक ड्रिल नुकतेच यशस्वीरित्या पार पडले आहे. गर्डर उभारणीच्या कामासंदर्भात रेल्वे सुरक्षा आयुक्तांना केलेल्या विनंती त्यांचे ना हरकत प्रमाण पत्र एका आठवड्याच्या आत मिळाले असून यासाठी लागणार वेळ मोठ्या प्रमाणार वाचला आहे.या गर्डर उभारणीच्या काम सुरळीत पार पडावे तसेच या दरम्यान सुरक्षेच्या उपाययोजना करण्यासंदर्भात लवकरच ठाणे जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, प्रादेशिक परिवहन विभाग, वाहतूक विभाग पोलिस आयुक्त यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करण्यात येणार असून गर्डर उभारणीच्या कामा दरम्यान रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी आणि जवान, पोलिस विभाग, वाहतूक अधिकारी घटनास्थळी तैनात केले जाणार आहेत. तसेच या काळात सुमारे २५० लोकल बंद राहणार असून नागरिकांना प्रवासासाठी त्रास होऊ नये यासाठी कल्याण डोंबिवली परिवहन आणि ठाणे परिवहन यांच्या अतिरिक्त बस सेवा सुरु ठेवणार असून यासंदर्भात लवकरच डोंबिवली परिवहन आणि ठाणे परिवहन अधिकारी यांच्या सोबत बैठकीचे आयोजन केले जाणार आहे.
या बैठकीत बऱ्याच कालावधीपासून मंजूरी करिता प्रलंबित असलेल्या कल्याण – शिळ रस्त्यावरील काटई रेल्वे उड्डाणपुलाच्या नकाशे लवकरात लवकर मंजूर करुन सदर कामाला गती मिळावी, यासाठी केलेली मागणी मान्य करत येत्या आठवड्याभरात नकाशांना मंजूरी देण्यात येईल असे रेल्वे प्रशासनाकडून आश्वासित करण्यात आले.कल्याण व डोंबिवली शहारांतर्गत तसेच शीळ – कल्याण- भिवंडी रस्त्यावरील वाहतूकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा पत्री पूल लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होणार असून सद्यस्थितीत नागरिकांना प्रवासासाठी होत असलेला त्रास आणि वाहतूक कोंडींच्या समस्येपासून मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार आहे.