राष्ट्रीय माध्यम पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

प्रतिनिधी.

मुंबई–  मतदार शिक्षण व मतदान जनजागृती विषयात सन 2020 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या प्रसारमाध्यमांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत राष्ट्रीय माध्यम पुरस्कार 2020 (नॅशनल मीडिया अवॉर्ड) देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी प्रसारमाध्यमांनी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे दि. 17 नोव्हेंबर 2020 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.

विविध माध्यमातून मतदार जनजागृती करणाऱ्या माध्यम संस्थांसाठी हे पुस्कार देण्यात येणार आहे. यामध्ये वर्तमानपत्र (प्रिंट मीडिया), इलेक्ट्रॉनिक (दूरचित्रवाहिनी) मीडिया, इलेक्ट्रॉनिक (रेडिओ) मीडिया व ऑनलाईन (इंटरनेट)/सोशल मीडिया अशा चार विभागात हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. माध्यमांद्वारे सुलभ मतदान, मतदान प्रक्रियेसंदर्भात जागृती, मतदानाचे महत्त्व आदी विषयांवर विविध माध्यमातून जनजागृतीचे उत्कृष्ट काम करणाऱ्या माध्यमांना हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.

भारत निवडणूक आयोगाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना पुरस्कारांसाठी माध्यम संस्थांची निकषांच्या आधारे शिफारस करण्याचे सूचित केले आहे. त्यामुळे माध्यम प्रतिनिधी व माध्यम संस्थांनी आपले अर्ज 17 नोव्हेंबरपर्यंत प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, 6 वा मजला, मंत्रालय विस्तार, मुंबई 400032 ईमेल ceo_maharashtra@eci.gov.in या पत्त्यावर पाठवावेत. पुरस्कारांचे निकष आणि अटींबाबत अधिक माहिती आयोगाच्या https://eci.gov.in/files/file/12547-national-media-award-for-best-campaign-on-voters-education-awareness-2020-memorandum-reg या लिंकवर उपलब्ध आहे.

माध्यम संस्था भारत निवडणूक आयोगाकडे थेट अर्जसुद्धा करू शकतात. त्यासाठीचे अर्ज दि. 20 नोव्हेंबरपर्यंत पवन दिवाण, अवर सचिव (संवाद), भारतीय निवडणूक आयोग, निर्वाचन सदन, अशोका रस्ता, नवी दिल्ली 110001, फोन नं. 011-23052133, ई मेल media.election.eci@.com, pppaaawandiwan@eci.gov.in या पत्त्यावर पाठवावेत.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web