सब ऑर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनच्या मागणीवर सकारात्मक निर्णय घेणार – ऊर्जामंत्री

प्रतिनिधी.

मुंबई – प्रत्यक्ष कार्यस्थळावर काम करत असताना येणाऱ्या अडचणी तसेच वीज कंपनीच्या हिताच्या दृष्टीने सबऑर्डीनेट इंजिनिअर्स असोसिएशनने सादरीकरणात केलेल्या सूचनांचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी स्वागत केले. भरती प्रक्रिया व फील्डस्तरावर काम करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्याच्या असोसिएशनच्या मागणीवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही डॉ. राऊत यांनी दिली.

ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता व तीनही कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक, संचालक यांची फोर्ट येथील एमएसईबी सुत्रधारी कंपनीच्या कार्यालयात बैठक घेतली.

प्रत्यक्ष मैदानात काम करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांना नेमक्या कोणत्या अडचणी येत आहेत, वीज कंपन्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी त्यांच्या काय सूचना आहेत, थकीत वीज बिल वसुलीसाठी कोणते उपाय करायला हवेत, याबद्दल प्रत्यक्ष मैदानावर काम करणाऱ्यांना काय वाटते, हे सादर करण्याची संधी मंत्री डॉ.राऊत यांनी सबऑर्डीनेट इंजिनिअर्स असोसिएशनला आज दिली.

असोसिएशनने कंपनीच्या हिताच्या दृष्टीने सादर केलेल्या सूचनांचा विचार करून कार्यवाही केली जाईल, असे डॉ. राऊत यांनी सादरीकरणानंतर सांगितले. तसेच कंपनीचा महसूल वाढविण्यासाठी व ग्राहकांकडून थकीत बिल कशाप्रकारे वसुल करता येईल यासाठी केलेल्या सूचना विशेष आवडल्याचे डॉ. राऊत यांनी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.

कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊन कालावधीत महावितरण कंपनीने वीज जोडणी न तोडणे व हप्त्यांत वीज बिल भरणा करण्याची सुविधा ग्राहकांना दिली आहे. लॉकडाऊनमुळे वीज वसुली न झाल्यामुळे महावितरणला आर्थिक फटका बसला आहे. अनेक ठिकाणी ग्रामीण भागात महावितरणच्या ग्राहकांना वीज बिल भरणा सुविधा नसल्यामुळे अडचण होते. ग्राहकांची ही अडचण सोडवण्यासाठी गाव पातळीवर एटीएम सेंटर उभारण्यात यावे. ‘माझी कंपनी, माझी जबाबदारी’, ही संकल्पना राबवून प्रथम महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आपले वीज बिल बँकेच्या माध्यमातून भरणा करावे आदी सूचना यावेळी असोसिएशनकडून मांडण्यात आल्या.

“आम्हाला आजवर केवळ आलेल्या सिस्टीममध्ये आमच्या सूचना देण्यास सांगण्यात येत होते. एखाद्या वेळेस संचालकांपर्यंत आमच्या सूचना लेखी स्वरूपात सादर करू शकलो होतो. मात्र डॉ. राऊत हे ऊर्जा क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी सकारात्मक आणि सक्रिय आहेत. त्यांनी स्वतः आम्हाला ऊर्जा क्षेत्रात अपेक्षित सुधारणा आणि उत्पादन खर्च कसे कमी करता येईल याबद्दल सादरीकरण करायला सांगितले. असे पहिल्यांदाच घडतेय की मंत्री स्वतःहून आम्हाला सूचना मागतात,” अशा शब्दात सबऑर्डीनेट इंजिनिअर्स असोसिएशनचे सरचिटणीस संजय ठाकूर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

अभियंत्यांकडून आलेल्या सूचनांचे सादरीकरण झाल्यावर प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी असोसिएशनचे विचार कंपनीच्या हितवर्धनाचे असून ही कंपनीच्या उज्ज्वल भविष्यासाठी चांगली बाब असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web