कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे साथरोगावर नियंत्रण, उत्तम कामगिरी

प्रतिनिधी.

ठाणे – कल्याण डोंबिवली सुरुवातीच्या काळात कोरोनाचे हॉटस्पॉट बनले होते, परंतु आता अँक्टिव रुग्णांची संख्या खुप कमी झाली असून महापालिका प्रशासनाने कोरोनावर उत्तम नियंत्रण मिळवलं आहे असे गौरोवोद्गार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काढले. कल्याण डोंबिवली मनपा मुख्यालयातील आयुक्त दालनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. तत्पुर्वी श्री राजेश टोपे यांनी महापालिकेने नुकत्याच‍ सुरु केलेल्या लाल चौकी आर्ट गॅलरी येथील कोविड समर्पित रुग्णालयाची पाहणी केली.महापालिकेत शासनाचे वैदयकीय आरोग्य अधिकारी नसल्याने एक उत्तम वैदयकीय आरोग्य अधिकारी उपलब्ध करुन देणेबाबत निर्देश त्यांनी उपस्थित असलेल्या ठाणे जिल्हा आरोग्य उपसंचालक डॉ. गौरी राठोड यांना दिले. महापालिकेत फिजीशियन कमी असल्याने तेही लवकर उपलब्ध करुन देण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. ठाणे जिल्हयात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी स्वतंत्र आरोग्य संचनालयाला शासनाने मंजूरी दिली आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. नुकतेच प्रशासनाने सादर केलेल्या पीपीपी तत्वावर हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजच्या प्रस्तावास महासभेने मंजुरी दिली आहे, या संकल्पनेचे कौतुक करत आरक्षित भुखंडावर पीपीपी तत्वावर रुग्णालय व मेडिकल कॉलेज उभारण्यास शासन सहाय्य करेल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. गरीब लोकांना सवलतीत आरोग्य सेवा देणे संबंधित विकासकास बंधनकारक राहील, असेही ते यावेळी म्हणाले. साथीच्या रोगासाठी ठाणे परिसरात लवकरच साथरोग रुग्णालय उभे राहणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. दिवसाला 900 पेशंट जरी आले तरी त्यांच्यावर उपचार करणे शक्य आहे अशी यंत्रणा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने उभारली असल्याचे सांगुन श्री टोपे यांनी महापालिकेच्या कामाचे कौतुक केले. डिसेंबरच्याशेवटी दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे प्रत्येकाने मास्क परिधान करणे व सोशल डिस्टंसिंग पाळणे अत्यावश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.आयुक्त डॉ. विजय सूर्यंवंशी यांनी महापालिकेने कोविड साथीच्या नियंत्रणासाठी केलेल्या विविध उपाययोजनांचे सादरीकरण केले. यावेळी महापौर विनिता राणे, माजी आमदार जगन्नाथ(अप्पा) शिंदे, जिल्हा आरोग्य उपसंचालक डॉ. गौरी राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंगे, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शहर अभियंता सपना कोळी(देवनपल्ली), सहा. संचालक नगररचना मारुती राठोड, उपआयुक्त सुधाकर जगताप, पल्लवी भागवत, वैदयकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, साथरोग नियंत्रण अधिकारी प्रतिभा पानपाटील, महापालिका सचिव संजय जाधव व अन्य अधिकारी उपस्थित होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web