एफ केबीन रस्त्याचे ९० टक्के काम पूर्ण, महिना अखेरीस रस्ता खुला होण्याची शक्यता

प्रतिनिधी.

कल्याण – कल्याण पूर्वेतील एफ केबिन रस्त्याचे 90% काम पूर्ण झाले असून येत्या महिना अखेरी पर्यंत तो वाहतुकीसाठी खुला होईल असा विश्वास केडीएमसीच्या शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली यांनी व्यक्त केला.या रस्त्याच्या कामाची
कोळी-देवनपल्ली यांनी मंगळवारी संध्याकाळी पाहणी केल्यानंतर ही माहिती दिली.

कल्याण पूर्वेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते एफ केबीन परिसरातील रस्ता साधारणपणे महिन्याभरापूर्वी काँक्रिटिकरणाच्या कामासाठी बंद करण्यात आला. आधीच पत्रीपुलाचे काम सुरू असल्याने कल्याण पूर्वेत जाण्यासाठी नागरिकांना या रस्त्याची मोठी मदत होत होती. मात्र तोही काँक्रिटिकरणाच्या कामासाठी बंद करण्यात आल्याने नागरिकांनी मोठया प्रमाणात नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी पुढील 2 महिन्यांत या रस्त्याचे काँक्रिटिकरणाचे काम पूर्ण करून हा रस्ता पुन्हा सुरू होईल अशी माहिती केडीएमसी प्रशासनाकडून देण्यात आली होती. परंतू केडीएमसीचा आतापर्यंतचा अनुभव पाहता नागरिकांचा त्यावर विश्वास बसत नव्हता. परंतु या रस्त्याचे सध्या 90 टक्के काम पूर्ण झाले असून येत्या महिनाखेरीस तो पुन्हा नागरिकांच्या सेवेत रुजू होईल असा विश्वास शहर अभियंत्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच या रस्त्याच्या कामामुळे नागरिकांना होणारा त्रास आम्ही समजू शकतो. त्यांनी आणखी थोडे दिवस महापालिकेला सहकार्य करावे, लवकरच हा रस्ता आम्ही खुला करू असे आवाहनही कोळी-देवनपल्ली यांनी यावेळी केले.

खड्ड्यांची समस्या सोडवण्यासाठी एफ केबिन पुलावर ‘मास्टिक अस्फाल्ट’….

दरम्यान याच परिसरातील एफ केबीन पुलावर दरवर्षी पावसाळ्यानंतर खड्ड्यांचे साम्राज्य पसरते. यावर उपाय म्हणून या पुलावर ‘मास्टिक अस्फाल्ट’ पद्धतीने रस्ता तयार केला जात असल्याची माहिती शहर अभियंत्यांनी यावेळी दिली. साधारण 2 वर्षांपूर्वी वालधुनी पुलावर ‘मास्टिक अस्फाल्ट’चा प्रयोग करण्यात आला होता. ज्यामुळे 2 वर्षे उलटूनही या पुलावरील रस्त्यावर एकही खड्डा पडलेला नाही. त्यामुळे एफ केबिन पुलावरही त्याच पद्धतीने रस्त्यावर ‘मास्टिक अस्फाल्ट’चा थर दिला जात आहे. ज्यामुळे एफ केबिन पुलावरील खड्ड्यांची समस्या संपुष्टात येण्यास मदत होईल असे सपना कोळी-देवनपल्ली यांनी सांगितले.  ‘मास्टिक अस्फाल्ट’ पद्धतीमध्ये रस्त्यासाठी सामान्यतः वापरण्यात येणाऱ्या प्रमाणापेक्षा अधिक प्रमाणात डांबर वापरला जातो. ज्यामुळे रस्त्यावर खड्डा पडण्याची शक्यता अगदी नगण्य असते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web