शहीद जवान मनोराज सोनवणे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

प्रतिनिधी.

मालेगाव – भारतीय लष्करातील २१ पॅराट्रूप स्पेशल फोर्समध्ये  कार्यरत असलेले शहीद जवान मनोराज शिवाजी सोनवणे हे अरुणाचल प्रदेशात देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत असताना तेथील उंच प्रदेशातील प्रतिकूल वातावरणामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. लष्कराच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली. शहीद जवान मनोराज शिवाजी सोनवणे यांच्यावर सायंकाळी ६ वाजता त्यांच्या मूळ गावी मानके पोस्ट चिखलओहोळ ता.मालेगाव जिल्हा नाशिक येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी राज्याचे कृषी तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी, उपमहापौर निलेश आहेर, महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती राजाराम जाधव, पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा देसाई, तहसिलदार चंद्रजित राजपूत, गट विकास अधिकारी जितेंद्र देवरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुनिल देवरे, यांच्यासह गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शहीद जवान मनोराज सोनवणे यांना श्रध्दांजली वाहिली.

सैन्यदलाचे दोन मेजर, एक ज्युनिअर कमिशन ऑफीसर आणि बारा जवान यांनी मानवंदना देऊन पुष्पचक्र अर्पण केले. राज्य शासनाच्या वतीने कृषी तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे, तर जिल्हा प्रशासनाच्या वतीने अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी, तहसिलदार चंद्रजित राजपूत तर सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अविनाश रसाळ यांनी पुष्पचक्र अर्पण केले.

तालुक्यातील मानके या गावचे मूळ रहिवासी मनोराज सोनवणे  हे १६ वर्षापासून भारतीय लष्करातील २१ पॅराट्रप या स्पेशल फोर्स मध्ये कमांडो पदावर कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी जयश्री सोनवणे, मुलगा तुषार सोनवणे, मुलगी तनू सोनवणे असा परिवार आहे.

त्यांचे पार्थिव मानके येथे आणल्यानंतर तेथे लष्कराच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली. शनिवारी मानके गाव व पंचक्रोशीतील तसेच तालुक्यातील नागरिकांनी आपल्या परिसरातील लाडक्या जवानाला भावपूर्ण निरोप दिला. यावेळी गावकऱ्यांनी ‘भारत माता की जय’ ‘अमर रहे’ यासारख्या घोषणा देऊन शहीद जवानाला सायंकाळी ६ वाजता अखेरचा निरोप दिला.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web