कल्याणात बिल्डरकडूनच बनावट मीटरद्वारे सदनिकाना वीजपुरवठा, वीजचोरांविरोधात महावितरणची कारवाई

प्रतिनिधी.

कल्याण – महावितरणच्या कल्याण पूर्व विभागातील उपविभाग एक अंतर्गत मंगळवारी आणि बुधवारी तब्बल ५२ वीजचोरांविरुद्ध धडक कारवाई करण्यात आली. ‘गॅलेक्सि रेसिडेन्सी’ आणि ‘द इम्पिरियल’ सोसायट्यांमधील दहा इमारतींमध्ये झालेल्या कारवाईत बिल्डरकडूनच चक्क बनावट मीटरद्वारे तसेच कांही ठिकाणी मीटरशिवाय सदनिकाधारकांना थेट वीजपुरवठा केल्याचे आढळून आल्याची माहिती महावितरणतर्फे देण्यात आली.

नागरिकांनी महावितरणचे संकेतस्थळ, मोबाईल अँप या ऑनलाईन सुविधेचा वापर किंवा नजीकच्या महावितरण कार्यालयात स्वतः अर्ज करून सुलभ प्रक्रियेतून अधिकृत वीजजोडणी घ्यावी विजेचा वापर करावा, असे आवाहन कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी केले आहे.

कल्याण पूर्व उपविभाग एकचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता जितेंद्र प्रजापती यांच्या नेतृत्वाखाली आडीवली आणि ढोकळी येथील ‘गॅलेक्सि रेसिडेन्सी’, ‘द इम्पिरियल’ सोसायट्यांमधील ३६० सदनिकांच्या वीज पुरवठ्याची तपासणी करण्यात आली. यात ५२ ठिकाणी विजेचा अनधिकृत आणि चोरटा वापर होत असल्याचे निदर्शनास आल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले. या वीज चोरट्यांनी जवळपास ८ लाख २० हजार किंमतीची ८२ हजार युनिट वीज चोरून वापरल्याचे निष्पन्न झाले. चोरून वापरलेल्या विजेचे देयक दंडासह भरण्याच्या नोटीसा संबंधितांना देण्यात येत असून भरणा न करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाईसाठी फिर्याद देण्यात येईल. या कारवाईत बिल्डरच्या माध्यमातून बनावट मीटरद्वारे पाच ठिकणी तर इतर ठिकाणी विजेचा थेट चोरटा वापर आढळून आला. वीज चोरांविरुद्धची मोहीम नियमितपणे सुरु राहणार असून कारवाई टाळण्यासाठी अधिकृत वीजजोडणी घेऊनच विजेचा वापर करण्याचे आवाहनही मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी केले आहे.

ही कारवाई मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल, कल्याण-एक मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता सुनील काकडे, कल्याण पूर्व विभाग कार्यालयाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र धवड यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रजापती, सहायक अभियंता नितीन दुफहरे, रोशन तिरपुडे, गजानन गवळी, प्राची कुलकर्णी, कनिष्ठ अभियंता सूर्यकांत वाघमारे, देवेंद्र पाटोळे यांच्यासह तांत्रिक या अतांत्रिक कर्मचाऱ्यांच्या १५ जणांच्या पथकातर्फे करण्यात आली.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web