छायाचित्रकारांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार

प्रतिनिधी.

मुंबई – ‘फोटोग्राफीक ॲण्ड आर्टिस्ट’ सोशल फाऊंडेशन संस्थेने आयोजित केलेल्या राष्ट्रीयस्तरावरील छायाचित्रण स्पर्धेतील विजेत्या छायाचित्रकारांना राजभवन येथे आयोजित कार्यक्रमात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पुरस्कार प्रदान केले.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते टाइम्स ऑफ इंडियाचे छायाचित्रकार संजय हडकर यांना प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला.

एशियन ऐज / डेक्कन क्रोनिकलचे छायाचित्रकार राजेश जाधव यांना द्वितीय पुरस्कार तर कोल्हापूर येथील छायाचित्रकार अश्पाक किल्लेदार यांना तृतीय परितोषिक प्रदान करण्यात आले.

पीटीआय व हिंदुस्तान टाइम्स मीडियासाठी काम करणारे छायाचित्रकार भूषण कोयंडे, नाशिक येथील लोकमतचे छायाचित्रकार प्रशांत खरोटे तसेच कोल्हापूर येथील छायाचित्रकार शरद पाटील यांना उत्तेजनार्थ पारितोषिके प्रदान करण्यात आली.

पुरस्कार विजेत्या छायाचित्रकारांचे अभिनंदन करताना राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले की, छायाचित्रकारांना अनेकदा आव्हानात्मक कठीण परिस्थितीमध्ये काम करावे लागते, प्रसंगी त्यांना लाठ्या – काठ्या खाव्या लागतात. छायाचित्रणाच्या माध्यमातून ते जनतेच्या समस्या समोर आणतात. ही देखील एक प्रकारची राष्ट्रसेवाच असल्याचे श्री. कोश्यारी यांनी नमूद केले.

‘पाऊस’ या मुख्य विषयावर यंदाची छायाचित्रण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये देशभरातून २१३ स्पर्धकांनी भाग घेतला व त्यातून सर्वोत्तम छायाचित्रांसाठी तीन पारितोषिके व ३ उत्तेजनार्थ पारितोषिके निवडण्यात आल्याची माहिती फोटोग्राफीक ॲण्ड आर्टीस्टस सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष समाधान पारकर यांनी यावेळी दिली. संस्थेचे विश्वस्त दीपक खाडे, संदीप आजगावकर व बाबु पवार हे देखील यावेळी उपस्थित होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web