डोंबिवलीत घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट,एचपी कंपनीसह एजन्सी- डिलीव्हरी बॉयवर गुन्हा दाखल

प्रतिनिधी.

डोंबिवली – स्वयंपाकासाठी लागणाऱ्या घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन चार जण होरपळल्याची घटना घटस्थापनेच्या दिवशी डोंबिवली जवळच्या खंबाळपाड्यात घडली होती. या दुर्घटनेला जबाबदार ठरलेल्या हिंदुस्थान पेट्रोलियम गॅस कंपनी आणि डोंबिवलीतील गॅस एजन्सी मालकासह सिलिंडर बॉयच्या विरोधात तब्बल नऊ दिवसानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
     खंबाळपाड्यातील महावीर सोसायटीतल्या सी विंग मधील ३०२ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये चव्हाण कुटुंबीय राहते. शनिवारी १७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजून ४९ मिनिटांनी या घरात सिलिंडरचा स्फोट झाला. या संदर्भात संतोष जयसिंग चव्हाण यांच्या फिर्यादीवरून टिळकनगर पोलिसांनी रविवारी २५ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल केला. शनिवारी १७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी संतोष यांची पत्नी विद्या या गॅस संपला म्हणून दुसरा सिलिंडर उघडत होत्या. सदर सिलिंडरचे बुच उघडताच सदर सिलिंडरमधून गॅस जोरात उसळून बाहेर पडला. याचवेळी देवघरातल्या पेटत्या निरंजनशी संपर्क आल्यामुळे गॅसचा भडका उडाला. यात विद्या यांच्यासह मुलगा उत्कर्ष आणि त्यांना वाचवण्यासाठी धावलेले शेजारी रेश्मा व त्यांचे पती संजय चावरे असे चौघे होरपळले. कशीबशी आग विझवल्यानंतर जखमींना तात्काळ डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तर या दुर्घटनेत चव्हाण यांच्या घरातील सामानाचे काही प्रमाणात नुकसान झाले. सद्या जखमी चौघांची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. या प्रकरणी जखमी गॅस ग्राहक संतोष चव्हाण यांच्या जबानीवरून पोलिसांनी हिंदुस्थान पेट्रोलियम गॅस कंपनी, डोंबिवली गॅस एजन्सीचे मालक अतुल देसाई यांच्यासह त्यांचा डिलिव्हरी बॉय प्रभाकर देढे यांच्या विरोधात भादंवि कलम ३३७, ३३८, २८५ अन्वये गुन्हा दाखल केला. हिंदुस्थान पेट्रोलियम गॅस कंपनीकडून सदोष बनावट असलेल्या गॅस सिलिंडरचा पुरवठा करणारे वितरक तथा डोंबिवली गॅस एजन्सीचे मालक अतुल देसाई आणि डिलिव्हरी बॉय प्रभाकर देढे यांची हयगय या अपघात अर्थात दुर्घटनेला कारणीभूत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या संदर्भात डोंबिवली गॅस एजन्सीचे मालक अतुल देसाई यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सदर दुर्घटना कुणामुळे घडली, कशी घडली हे महत्वाचे नसून अपघात घडला हे मान्य आहे. माणुसकीला धरून आम्ही जखमींना मदत करत आहोत. अपघात घडल्याच्या दुसऱ्या दिवशी दुपारी एचपीचे एरिया सेल्स मॅनेजर प्रशांत वर्मा, टेक्निकल असिस्टंट अभिमन्यू झा, विमा कंपनीचे सर्व्हेअर, आदींनी घटनास्थळी भेट देऊन जखमींचीही विचारपूस केली. जखमींना सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचेही अतुल देसाई यांनी सांगितले. या दुर्घटनेचा अधिक तपास फौजदार नवनाथ वाघमोडे करत आहेत.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web