प्रतिनिधी.
डोंबिवली – डोंबिवली ते शिळफाट्याचा तासन् तास रखडवणारा प्रवास, खड्डे, वाहतूक कोंडी यावर उपाय म्हणून डोंबिवलीकरांनी चक्क जलमार्गाचा पर्याय शोधून काढलाय. डोंबिवलीहून सुटणाऱ्या या बोटीने अवघ्या अर्ध्या तासात ठाणे गाठता येतं.मात्र बोटीने प्रवास करणाऱ्याची संख्या वाढत चालली असून सुरक्षेची कोणतीही खबरदारी न घेता प्रवास केला जातो आहे. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय.
राज्यात मिशन बिगीन अगेन आणि अनलॉक सुरू झालं असलं, तरीही सर्वसामान्य प्रवाशांना मात्र अजूनही लोकल प्रवासाची मुभा मात्र मिळालेली नाहीये. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीकर चाकरमान्यांना रस्ते मार्गाने, म्हणजेच शिळफाट्यामार्गे ठाणे मुंबईचा प्रवास करावा लागतोय. मात्र या प्रवासामध्ये वाहतूक कोंडी, खड्डे यामुळे अनेक तास वाया जातात. त्यामुळेच यावर उपाय म्हणून डोंबिवलीकरांनी आता जलमार्गाचा वापर सुरू केलाय. डोंबिवली पश्चिमेच्या मोठागाव रेतीबंदरहून माणकोली जवळच्या वेहेळे गावापर्यंत फेरीबोट सेवा सुरू आहे. या बोटीने आता हे चाकरमानी प्रवास करून ठाणे गाठतात. मोठागाव ते वेहेळे या प्रवासाला अवघी पाच मिनिटं लागतात. तिथून माणकोलीपर्यंत रिक्षाने दहा मिनिटं आणि माणकोलीहून ठाण्यापर्यंत रिक्षाने पंधरा मिनिटं अशा अवघ्या अर्ध्या तासात डोंबिवलीकर प्रवासी वाहतूक कोंडी टाळून ठाणे गाठतात. ठाण्यात जाण्यासाठी कमी वेळ लागत असल्याने या बोटीला प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
त्यामुळे बोटीतून जास्तीतजास्त प्रवासी भरून नेले जातात आणि सुरक्षेची कोणतीही खबरदारी न घेता प्रवास केला जातो आहे. जर एखादी दुर्घटना झाली तर जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.तर याला महाराष्ट्र शासन जबाबदार आहे असे भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.तर बोटीतून पाच ते सहाची कॅपेसिटी असताना पंधरा ते वीस जण प्रवास करतात,एखादी दुर्घटना घडली कोण जबाबदारी घेणार? असा सवाल मनसे आमदार राजू पाटील यांनी केला आहे.