कल्याणात एक्ससाईज पथकावर प्राणघातक हल्ला, ३ जणांना अटक

प्रतिनिधी.

कल्याण – देशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाला थांबवणाऱ्या कल्याण (उत्पादन शुल्क विभाग) एक्साईजच्या पथकावर त्यांच्या कार्यालयासमोर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना कल्याणात समोर आली आहे. यामध्ये 3 जण जखमी झाले असून याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी तिघा जणांना ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.

कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात एका अल्टो कारमधून काही जण देशी दारू घेऊन येणार असल्याची माहिती कल्याण एक्साईजचे अधिकारी सुनील कणसे यांना मिळाली होती. त्यानूसार त्यांच्या पथकाने सापळा रचून संबंधित गाडीची तपासणी करत कारचालकाला ताब्यात घेत आपल्या कार्यालयात जाण्यास निघाले. मात्र या कार्यालयासमोरच 8 ते 10 अज्ञात व्यक्तींनी त्यांची गाडी अडवून ‘तुम्हाला कारवाईसाठी आम्हीच भेटतो का?’ असे विचारत काठी आणि लोखंडी सळीने एक्साईजच्या पथकावर हल्ला चढवल्याची माहिती एक्साईज विभागाने दिली. या हल्ल्यात सुनील कणसे यांच्यासह तीन कर्मचारी जखमी झाले. तर या सर्व झटापटीत टोळक्याने कारचालकाला घेऊन पोबारा केला. हल्ला करणाऱ्या टोळीतील काही जणांना एक्साईजच्या कर्मचाऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी 3 जणांना अटक केली असून इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web