महाराष्ट्राला ग्रामीण स्वच्छताविषयक राष्ट्रीय स्तरावरील पाच पुरस्कार

प्रतिनिधी.

मुंबई – ग्रामीण भागात केलेल्या स्वच्छता विषयक उल्लेखनीय कार्यासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते आज महाराष्ट्राला एकूण पाच राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

राज्य पातळीवरील दोन, जिल्हा श्रेणीत जळगाव तर ग्राम पंचायत श्रेणी मध्ये यवतमाळ व भंडारा जिल्ह्यातील प्रत्येकी एका ग्रामपंचायतीचा यात समावेश आहे.

महात्मा गांधी जयंती व स्वच्छ भारत दिनाचे औचित्य साधून केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागाच्या वतीने ग्रामीण स्वच्छताविषयक विशेष कामगिरीबद्दल ‘स्वच्छता  दिवस पुरस्कार २०२०’ वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत व राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे  विविध श्रेणींमध्ये हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाने ही चमकदार कामगिरी बजावली आहे.

राज्याच्यावतीने अपर मुख्य सचिव डॉ.संजय चहांदे, सहसचिव व प्रकल्प संचालक अभय महाजन, राज्यातील सर्व पुरस्कार विजेत्या ग्रामपंचायती, जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी दूर दृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार

जलशक्ती मंत्रालयाने १५ जून ते १५ सप्टेंबर २०२० या कालावधीत आयोजित केलेल्या  ‘सामुदायिक शौचालय अभियान’ अंतर्गत ग्रामीण भारत सुरक्षित शौचालय निर्माणासाठी राज्याला देशात दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याने केलेल्या कामगिरीमुळे विशेष म्हणजे जुलै ते सप्टेंबर या लॉकडाऊन काळात राबविलेल्या उपक्रमामुळे हा पुरस्कार मिळाला आहे.

गंदगी मुक्त अभियानात राज्य तिसरे

यावर्षी ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान केंद्र सरकारने ‘गंदगी मुक्त भारत  अभियान’ राबविले. यामध्ये राज्यातील ग्रामीण भागातील  जनतेने स्वच्छतेसाठी जास्तीत जास्त श्रमदान केले. म्हणून राज्याला  श्रमदान प्रकारात तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जळगाव जिल्ह्याचा सन्मान

सामुदायिक शौचालय अभियान अंतर्गत  जळगाव जिल्ह्याला देशात तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कान्हाळगाव आणि बोरीखुर्द ग्रामपंचायतींची चमकदार कामगिरी

स्वच्छ सुंदर सामुदायिक शौचालय अभियानात भंडारा जिल्ह्यातील कान्हाळगाव ग्रामपंचायतीस राष्ट्रीय स्तरावर दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सामुदायिक शौचालय अभियानामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील बोरी खुर्द या ग्राम पंचायतीस देशात तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

राज्यातील सर्व पुरस्कार  विजेत्या ग्रामपंचायत, जिल्हा परिषद यांचे तसेच गावकरी व संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांचे  तसेच राज्यालाही दोन पुरस्कार मिळाल्याबद्दल राज्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी अभिनंदन केले आहे. राज्याला कोविड 19 च्या प्रादुर्भावाची परिस्थिती असतानाही ग्रामीण जनतेसाठी अहोरात्र काम करून पुरस्कार मिळवून देणाऱ्या सर्व स्वच्छता कार्यकर्त्यांचेही श्री. पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web