महावितरणच्या ग्राहकांसाठी कल्याण परिमंडल कार्यालयात स्वागत कक्ष सुविधा

प्रतिनिधी.

कल्याण – कल्याण परिमंडल कार्यालयातील स्वागत कक्षाचे महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके (भाप्रसे) यांच्या हस्ते उदघाटन झाले. स्वागत कक्षामुळे परिमंडल कार्यालयात येणाऱ्यांना ग्राहकोपयोगी माहिती मिळण्यासह त्यांच्या कामाचा निपटारा अथवा तक्रार निवारणात सुलभता येणार आहे. कोणत्या ग्राहकाला ताटकळत  राहू शकत नाही आणि मानसिक समाधान  वाढून वातावरण निर्मिती होण्यास मदत  होणार यात कुठलेही दुमत नाही .
आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग वाढवून महावितरणने वीज ग्राहकांना जवळपास सर्वच सेवा ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत. हाताच्या बोटावर उपलब्ध असलेल्या या सुविधांच्या माध्यमातून ग्राहक आपल्या वेळ व पैशांचीही बचत करू शकतात. स्वागत कक्षात आकर्षक फलकाद्वारे या सर्व सुविधांची माहिती देण्यात आली आहे. यासोबतच महावितरणच्या कृतीची मानके (एसओपी) यांदर्भातही माहितीफलक लावण्यात आला आहे. कार्यालयाला भेट देणाऱ्या वीज ग्राहक किंवा इत्तर यांच्या तक्रार अथवा काम तसेच संबंधित अधिकाऱ्याच्या प्रतिसादाबाबत लेखी अभिप्राय स्वागत कक्षामार्फत नोंदविण्यात येईल व कार्यालयीन स्तरावर त्याचा पाठपुरावा केला जाईल. यातून तक्रारींचे निवारण व कामांचा निपटारा होण्यास मदत मिळणार आहे. स्वागत कक्षाच्या सुविधेत सातत्य व दर्जा राखण्याची सूचना सहव्यवस्थापकीय संचालक बोडके यांनी उदघाटनावेळी केली.
यावेळी मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल, कोकण प्रादेशिक कार्यालयाचे महाव्यवस्थापक अनिल बऱ्हाटे, अधीक्षक अभियंता अनिल घोगरे, उपमहाव्यवस्थापक अनिल खैरनार, कल्याण मंडळ एकचे अधीक्षक अभियंता सुनील काकडे, कल्याण मंडल दोनचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तावडे, वसई मंडलचे अधीक्षक अभियंता राजेशसिंग चव्हाण, पालघर मंडलच्या अधीक्षक अभियंता किरण नगावकर, सहायक महाव्यवस्थापक धैर्यशील गायकवाड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर, वरिष्ठ व्यवस्थापक विश्वनाथ कट्टा आदी उपस्थित होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web